मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी ४६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध सूचना देण्यात येत आहे. यामध्ये अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा यासारखे अनेक आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने एक खास व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले आहे.
मनसेने ट्विटरवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कोरोनाच्या अमानवी संकटाच्या काळात समाजभान जपा, कोरोना रुग्णांशी सौजन्यानं वागा असं आवाहन केलं आहे. तसेच दोन माणसांमधलं शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका असा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सोशल डिस्टन्सिंग'चा भलताच अर्थ घेऊन काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना वा त्यांच्या कुटुंबीयांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेने 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेचा आधार घेत लोकांना आवाहन केले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लागू असलेला लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. मात्र काही जण गरजूंना मदत करत असताना फोटो सेशन करत असल्याचं समोर येत आहे. अशा प्रकारे फोटो सेशन न करण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले होते.