Join us

Coronavirus: 'तुमचं आयुष्य माझ्यासाठी मोलाचं आहे'; राज ठाकरेंनी केलं 'असं' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:38 PM

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे.

मुंबई: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. मुंबईमध्ये 22 वर्षांची तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ती युरोपमधून भारतात दाखल झाली होती. तर दुसरी पॉझिटिव्ह महिला 49 वर्षांची असून उल्हासनगरची आहे. ही महिला दुबईवरून भारतात आली होती. तसेच अहमदनगरमध्ये देखील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे आता राज्यात कोरोनाची लागणं झालेल्या रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे. राज्य सरकार कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दी टाळण्यासोबतच विविध आवाहन करत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील कोरोनाशी मुकाबला कसा करायचा याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे मनसेच्या कार्यकर्त्यांना कोरोनाबाबत विविध सूचना दिल्या आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितले.

महाराष्ट्र सैनिकांनी पुढील गोष्टी करायला पाहिजेत अश्या सूचना देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत-

१) आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.

२) आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.

३) आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.

४) आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे.

५) आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.

६) ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.

७) महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी.

८) सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या.

९) आणि हो, ह्या सगळ्यात तुम्ही तुमची, तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्या. बाहेर जाताना मास्क लावा, 'सॅनिटायझर'ने हात स्वच्छ करत रहा आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचं आयुष्य हे माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी मोलाचं आहे हे विसरू नका.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 171 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रमनसे