Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:18 AM2020-05-26T11:18:51+5:302020-05-26T11:23:12+5:30

या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय?

Coronavirus: MNS Chief Raj Thackeray's demand to the governor over last year student exam pnm | Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे?परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाहीपरीक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नको

मुंबई – सध्या महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबत सुरु असलेल्या गोंधळाविषयी राज्यात अनेक चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. मे महिना संपत आला तरी या परीक्षांचा निर्णय होत नाही आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे असं राज ठाकरेंनी राज्यपालांना सांगितले आहे.

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती भयंकर असल्याने गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता आणखी किती काळ लॉकडाऊन राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. लॉकडाऊन शिथिल केला तरी कोरोना संपला असं होत नाही, अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान जाणून देशाने इतका मोठा लॉकडाऊन केला, कारण लोकांचा जीव वाचला तर पुढे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्स आणि महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा काही प्रोजेक्ट्स देऊन अथवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल, अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या विषयांचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेलं असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे किमान त्यात परीक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नको, निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पोलीस हवालदाराची पोरगी IAS झाली; सातारच्या बोरी गावच्या स्नेहल धायगुडेची आकाशाला गवसणी

दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण...

...अन् शरद पवारांनी थेट 'मातोश्री' गाठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तब्बल २ तास चर्चा

‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’च्या वापराबाबत WHO चा इशारा; औषधाची ट्रायल करण्यास बंदी

Read in English

Web Title: Coronavirus: MNS Chief Raj Thackeray's demand to the governor over last year student exam pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.