Join us

coronavirus: "गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी बस, विशेष रेल्वे सोडा" मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:24 PM

कोकणातील मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव तोंडावर आला असताना कोरोनामुळे मुंबईकर चाकरमान्यांच्या गावी जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक सण, उत्सवही रद्द करावे लागले आहेत. आता कोकणातील मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबईकर चाकरमान्यांच्या गावी जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. चाकरमान्यांच्या गावी जाण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. आता मनसेनेही गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून, त्यात ते म्हणतात की, "गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल."

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरून भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली होती. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी ई-पासची अट असू नये अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसगणेशोत्सव