CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:21 PM2020-03-31T21:21:44+5:302020-03-31T21:22:39+5:30
जनतेची मदत करण्यास राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही सगळेच आपापल्या परिसरात मदतकार्य करत आहोत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही अनेकांनी मदतीचा हात दिलेला आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेतेसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मनसे नेते नितीन सरदेसाई मदतीला धावले आहेत. जनतेची मदत करण्यास राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही सगळेच आपापल्या परिसरात मदतकार्य करत आहोत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत.
राजसाहेबांच्या प्रेरणेने आणि समाजाप्रति आपण काही देणे लागतो या भावनेने, आज एक पाऊल आणखीन पुढे टाकत असून, या आजाराचा सामना करण्यासाठी सरदेसाई कुटुंबीयांतर्फे रु. १०,००,००/- (दहा लाख रुपये) 'महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी'मध्ये जमा करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सदर धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे त्यांनी आज सुपूर्द केला आहे. या संकटाशी लढण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनता व प्रशासनासोबत आहे व राहील. आपल्या देशावर, राज्यावर आलेले हे संकट लवकरात लवकर दूर होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. घरात राहा, सुरक्षित राहा, असा सल्लाही त्यांनी जनतेला दिला आहे.
राज्यात आज एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत, तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३३१ नमुन्यांपैकी ५७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.