Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 04:10 PM2020-04-17T16:10:01+5:302020-04-17T16:21:44+5:30
सरकारी डॉक्टर व स्टाफ प्रमाणे आपल्यालाही सवलती व संरक्षण मिळावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आज राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. देशभर व्यापलेल्या कोरोनवर मात करण्यासाठी आज सरकारी डॉक्टरची कमतरता भासत असताना हे डॉक्टर आज कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्यासाठी विनामोबदला योगदान देत आहेत पण शासनाने सरकारी डॉक्टर व कर्मचारी यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत परंतु याचा फायदा खासगी डॉक्टर व स्टाफला मिळणार नाही असं मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून निदर्शनास आणलं आहे.
याबाबत मनसेनं पत्रात म्हटलंय की, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य करायला हव्यात. कोरोनासारख्या महामारीला हद्दपार करायचे असेल तर एकत्रित येण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारी डॉक्टर व स्टाफ प्रमाणे आपल्यालाही सवलती व संरक्षण मिळावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करुन तात्काळ कार्यवाही करावी. कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयामधील डॉक्टर, नर्स यांना सवलती, संरक्षण मिळण्यासाठी तातडीने आदेश काढून सहकार्य करावे अशी मागणी राजू पाटील यांनी पत्रात केली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आज सरकारी डॉक्टरांची कमतरता भासत आहे, #IMA चे डाॅक्टर कोरोनाच्या रूग्णांना बरे करण्यासाठी भरीव योगदान देत आहेत.शासनाने सरकारी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या सवलती व संरक्षण सेवा देणाऱ्या खाजगी डाॅक्टरांना मिळाव्यात अशी मागणी केली आहे.@rajeshtope11pic.twitter.com/0yWkubFSoO
— Raju Patil (@rajupatilmanase) April 17, 2020
काय आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या
1. सरकारने महामारी रोग अधिनियम 1987 लागू केला आहे त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि आरोग्यसेवक या कायद्यानुसार सेवा देत असून साथीच्या आजारांना सेवा देणे आव्हानात्मक आहे. परंतु अलीकडच्या काळात वैद्यकीय व्यवसाईकांकडे वैद्यकीय दुर्लक्ष केल्याबद्दल जाणीवपूर्वक नुकसान भरपाई मागणी केली जाते वास्तविक उपचार पद्धती व्यवस्थापीत केल्या जाणाऱ्या प्रोटोकॉल नुसार कोविड-19 आजाराचे उपचार सुरू आहेत तरीही डॉक्टर ना अडचणीत आणण्याचा काही जणांच्या प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कोरोना विरुद्ध लढाई ला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामारी रोग अधिनियम 1987 अंतर्गत कायदेशीर तरतुदीनुसार कलम 4 मध्ये याविरुद्ध संरक्षण असल्याचा उल्लेख असून त्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी किंवा चांगल्या श्रद्धेने काम केलेल्या कोणत्याही व्यक्तिविरुद्ध खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई होणार नाही असा उल्लेख आहे. तरी कोरोना उपचारादरम्यान डॉक्टर, कर्मचारी आणि आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे.
2. सरकारी डॉक्टर, नर्स, स्टाफ याना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सवलती,मोबदला व इन्शुरन्स जाहीर करण्यात आले तशाचप्रकारे कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या व शासनाने परवानगी दिलेल्या खाजगी रुग्णालयामधील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनाही हे सर्व फायदे देण्यात यावेत.
3. कोरोना वर उपचार करण्यासाठी डोंबिवली मध्ये १ सरकारी रुग्णालये आणि १ खाजगी रुग्णालय ला परवानगी देण्यात आली आहे, या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होते त्यामुळे येथील डॉक्टर, नर्स व कर्मचारी याना संरक्षण मिळावे.