coronavirus: चिंता वाढली ! सलग दुसऱ्या दिवशी राज्यात सापडले कोरोनाचे १५ हजारांहून अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:31 PM2021-03-13T20:31:16+5:302021-03-13T20:48:14+5:30
Coronavirus in Maharashtra : सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात कोरोनाचे १५ हजार ६०२ नवे रुग्ण सापडले आहेत.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वर जात असलेला राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख आजही चढताच राहिला. (Coronavirus in Maharashtra ) सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात कोरोनाचे १५ हजार ६०२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. (More than 15,000 corona patients found in Maharashtra for second day in a row, Mumbai figures also raise concerns)
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे १५ हजार ६०२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर या काळात राज्यात तब्बल ८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात राज्यात ७ हजार ४६७ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आज सापडलेल्या १५ हजार ६०२ रुग्णांमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ९७ हजार ७९३ झाली आहे. तर आतापर्यंत २१ लाख २५ हजार २११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १ लाख १८ हजार ५२५ झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात ५२ हजार ८११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे मुंबईमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईमध्ये आज १७०० हून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ११६९ रुग्ण सापडले आहेत.
Maharashtra reports 15,602 new COVID-19 cases, 7,467 discharges, and 88 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) March 13, 2021
Total cases: 22,97,793
Total discharges: 21,25,211
Active cases: 1,18,525
Death toll: 52,811 pic.twitter.com/GeWnZZG5Bg
दरम्यान, काल राज्यामध्ये १५ हजार ८१७ नवे रुग्ण सापडले होते. सध्या देशात सापडत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून नवे रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. तसेच राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
महाराष्ट्राबरोबरच देशाला कोरोना साथीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होत असून, गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाख नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी १३ लाख झाली असून, शुक्रवारी ११७ जणांचा बळी गेला.