Coronavirus: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:59 AM2021-05-23T07:59:34+5:302021-05-23T08:02:23+5:30
Coronavirus News: राज्यात दिवसभरात २६ हजार १३३ रुग्ण आणि ६८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ इतकी असून, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे.
मुंबई - राज्यात शनिवारी ४० हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्क्यांवर आले आहे, तर सध्या ३ लाख ५२ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात २६ हजार १३३ रुग्ण आणि ६८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ इतकी असून, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे. राज्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२६ दिवसांवर
मुंबई : मुंबईत शनिवारीही रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात १ हजार ८२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ५१ हजार २१६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या २८ हजार ५०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात दिवसभरात १२९९ रुग्ण आणि ५२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ९६ हजार ३७९ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ५७४ झाला आहे.१५ ते २१ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद आहे.
राज्यात २ कोटी ६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
मुंबई : राज्यात शुक्रवारी १ लाख २० हजार ७४३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ६ लाख २४ हजार ९३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात ११ लाख ५६ हजार २४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख १७ हजार ८२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १६ लाख ३७ हजार ४१८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ४४ हजार ११२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील एकूण ६ लाख ८३ हजार ९३२ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. १ कोटी २७ लाख ७५ हजार १२४ सामान्य नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.