मुंबई : आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आज देशाचे कोरोनाचे केंद्र बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजनांनंतरही मुंबईत कोरोना रु ग्णांची मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे लॉकडाउनची डेडलाइन जवळ येत असताना कोरोना रु ग्णांच्या वाढत्या संख्येने मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल, खासगी कार्यालये बंद ठेवणे, एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवणे अशा उपाययोजना मार्च महिन्याच्या पंधरवड्यात राज्य सरकार आणि महापालिकेने सुरू केल्या. मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मुंबईत अधिक असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली. दाटीवाटीने उभ्या असलेल्या मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तेथे प्रादुर्भाव थोपविण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
पूर्व उपनगरातून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण मध्य मुंबईत विशेषत: धारावी, वरळी, भायखळा या भागांमध्ये कोरोनाचे रु ग्ण झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहेत. वरळी परिसरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यापाठोपाठ धारावी परिसरात आतापर्यंत पाच रुग्ण सापडले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधेरी, ग्रँट रोड, वांद्रे, मालाड, चेंबूर, गोवंडी या भागांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.