Join us

CoronaVirus: महाराष्ट्रात 3 मे नंतर लॉकडाऊनमध्ये अधिक मोकळीक, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:30 PM

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनमध्ये असलेल्या भागांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

मुंबई - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनमध्ये असलेल्या भागांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ३ तारखेनंतर राज्यातील काही भागात मोकळीक देण्यात येणार आहे. पैकी ग्रीन झोनमध्ये अटी काहीशा शिथील केल्या जातील. मात्र रेड झोनमध्ये अद्याप धोका कायम असल्याने या भागात बंधने कायम ठेवली जातील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी रोखण्यात आपल्याला यश मिळाले आहे. मात्र लॉकडाऊन झाले नसते तर कोरोनाची गती गुणाकाराच्या पटीत वाढली असती, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच राज्यात ३ मे नंतर कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे पुढे काय? अशी विचारणा केली जात आहे. 3 तारखेनंतर काय करणार, असे विचारले जात आहे. आता लॉकडाऊनमुळे राज्याचे अर्थचक्र रुतले आहे. पुढच्या काळात बेकारी वाढणार. अशी भीती व्यक्त केल जात आहे. हे थोडंसं खरं आहे.  नाही असं नाही. पण प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची खरी संपत्ती जनता.तिला प्राथमिकता द्यायला हवी. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आता तीन तारखेनंतर लॉकडाऊनमधून अधिक मोकळीक देण्याचा  निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र ही मोकळीक रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनप्रमाणे देण्यात येईल, पण ही मोकळीक घाई-गडबड न करता देणार आहोत. लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच कामं अडली आहेत, पण ती सुरू करताना आत्तापर्यंत केलेली तपश्चर्या व्यर्थ व्हायला नको. आयुष्याची गाडी धीराने, खंबीरपणे पूर्वपदावर आणायची आहे.

राज्यातील कोरोनाचे रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी आहेत. तर ऑरेंज झोन म्हणजे निद्रीस्त ज्वालामुखी आहेत. तसेच ग्रीन झोनमध्ये आता काही होण्याची शक्यता नाही. मात्र तिथेही काळजी घ्यावी लागेल. राज्यातील रेड झोन असलेल्या मुंबई एमएमआर, पुणे, नागपूर, संभाजीनगर रोज आकडे वाढताहेत. त्यामुळे तिथे बंधने कायम ठेवावी लागतील. ऑरेंज झोनमध्ये ज्या भागात अॅक्टिव्ह केसेस आहेत, तो भाग वगळून उर्वरित जिल्ह्यात काय कारभार सुरू करतो शकतो यावर विचार सुरू आहे. ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील केले आहेत, ते आणखी करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली ते म्हणाले की,’कोणत्याही परिस्थितीत शेतीवर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. बी-बियाणं खत कमी पडणार नाही. मालवाहतूक मोकळी केली आहे. हळूहळू बंधन उठवत आहोत. पण झुंबड झाली तर बंधनं टाकावी लागतील, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार