मुंबई – राज्यात मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांत कोरोनाचे सावट अधिक गडद होते आहे. गुरुवारी एकट्या मुंबईची कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा ओलांडला असून आता २ हजार ४३ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. यात दिलासादायक म्हणजे मागील दोन दिवसांत शहरांतील रुग्ण संख्येचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण महापालिका प्रशासनाने नोंदविले आहे.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहे. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गुरुवारी राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी मुंबईचे ३, पुण्यातील ४ आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. सात मृत्यूंपैकी ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ८६ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणा-या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.राज्यात सध्या २९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण ५६६४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
गुरुवारी भरती झालेले संशयित रुग्ण २९९
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ५६७८
गुरुवारी निदान झालेले रुग्ण १०७
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण २०७३
गुरुवारी झालेल्या मृत रुग्णांची नोंद ०३
एकूण मृतांची संख्या ११७
गुरुवारी कोविडमधून मुक्त झालेले रुग्ण २१
कोविड आजारातून मुक्त झालेले रुग्ण २०२