मुंबई : मुंबईतील अन्य भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण येत असताना पूर्व उपनगरात नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या मुलुंडमध्ये आता एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या पती आणि मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याआधी वरळी येथील नगरसेविका व तिच्या पतीला तसेच कुर्ला येथील एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने जनजागृती व मदतीसाठी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका आपल्या विभागात फेरफटका मारत असतात. त्यामुळे त्यांना व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.दरम्यान, भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उजेडात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेले काही दिवस त्या आपल्या विभागातील लोकांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही या नगरसेविकेने केले आहे.
coronavirus: मुलुंडमधील नगरसेविकेला कोरोना, पतीसह मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 6:45 AM