मुंबई : पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुबईवरून आलेल्या या कोरोना बाधित दाम्पत्याच्या निकटवर्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील दोन प्रवाशांची सुद्धा कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोग शाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता 7 वर पोहोचला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात दुबईहून आलेले दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे काल उघड झाले होते. याशिवाय हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला ज्या टॅक्सीने गेले, त्या टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तींचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात असता या कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत विमानात प्रवास करणाऱ्या मुंबईतील दोघांना लागण झाल्याचे आढळून आले. या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, कोरोनाचा झपाट्याने होणारा हा संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरु असून प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याही तपासण्यात करण्यात येत आहेत. तसेच, या दाम्पत्यासाेबत जे 40 लाेक दुबईला फिरण्यास गेले हाेते, त्यांचा देखील शाेध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.