मुंबई : मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक धोका झोपडपट्ट्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली असून ६० टक्के मृत्यू हे दाटीवाटीच्या लोकवस्तीमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईत धारावी, मुलुंड, मानखुर्द, कुर्ला, शिवाजीनगर, बैंगनवाडीसह अनेक मोठ्या झोपडपट्ट्या असल्यामुळे या भागांत कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तरीही मुंबईतील रुग्णसंख्या १० हजारांवर गेली असून ४००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या लोकवस्तीत ‘सहवासितांच्या शोधा’ने कोरोनाचा प्रसार वाढत आहे.
यातच दीर्घकालीन आजार आणि वार्ध्यक्य असल्यास कोरोना घातक ठरत असल्याने पालिकेसमोर आव्हान आणखी वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका घरोघरी जाऊन आॅक्सिमीटरच्या माध्यमातून ज्येष्ठांची तपासणी करून धोका असणाऱ्यांवर उपचार करीत आहे. मात्र दाटीवाटीच्या वस्तीत रुग्णाशी येणाºया ‘सहवासितांच्या शोधा’मुळे लागण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना क्वारंटाइन करावे लागत आहे.
धारावी झोपडपट्टी परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा ७००वर गेला असून या ठिकाणी आतापर्यंत २१ जण मृत झाले आहेत. मुलुंड येथील झोपडपट्टीत एकाच दिवशी ५०हून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. वरळी कोळीवाड्यासारख्या दाटीवाटीच्या परिसरातही क्लोज कॉण्टॅक्टमुळे रुग्णवाढ होत आहे.शहरात ८० टक्के कंटेनमेंट झोन झोपडपट्टीतचकोरोना रुग्ण जास्त आढळलेले भाग पालिकेकडून कंटेनमेंट झोन जाहीर करून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मात्र यामध्येही झोपडपट्टी भागातच सर्वात जास्त कंटेनमेंट झोन असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत मुंबईत दोन हजारांवर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून ८० टक्के कंटेनमेंट झोन हे झोपडपट्टी भागातच आहेत. यामधील ६४१ कंटेनमेंट झोन हे रेड झोनमधील आहेत. तर ५०२ कंटेनमेंट झोन हे आॅरेंज झोनमधील आहेत. या आॅरेंज झोनमधील स्थिती नियंत्रणात असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या मृतांमधील ६० टक्के मृत्यू हे झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरातील असल्याचे पालिकेने सर्वेक्षणातून स्पष्ट केले आहे.कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी, शासकीय व पालिका रुग्णालयांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्यात आले आहे. मुंबईत वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता उपचार व विलगीकरण सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी पालिकेने येत्या १५ दिवसांत आणखी कोरोना काळजी केंद्र (कोरोना केअर सेंटर) उभारण्याचे नियोजन केले आहे.महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गउद्यान, गोरेगाव येथील नेस्को मैदान आदी ठिकाणी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. तीव्र स्वरूपाच्या बाधितांसाठी सध्या असलेली ३ हजार खाटांची क्षमता वाढवून ती ४ हजार ७५० होणार आहे. त्यासाठी नायर, केईएम, सेव्हन हिल्स इ. रुग्णालयांचा समावेश आहे. मोबाइल अतिदक्षता खाटाही नॅशनल स्पोर्ट्स सेंटर आॅफ इंडिया डोम (एनएससीआय) येथे तयार करण्यात येतील़