मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकावर कोरोना विषाणू लढाईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांची भित्तिचित्रे काढून त्यांच्या कार्याला सलामी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, भाजी विक्रेते, डिलिव्हरी व्यक्ती आणि स्वच्छता कामगार यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे त्यांची भित्तिचित्रे काढून मानवंदना दिली आहे.
माहीम स्थानकाची भिंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरुवातीला त्याची दुरुस्त करण्यात आली. नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्याचे काम एका खासगी कंपनी द्वारे करण्यात आले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर म्हणाले की, माहीम स्टेशनवरील ‘हिरोज ऑफ मुंबई’ प्रकल्पाने केवळ स्थानकाचे सौंदर्यीकरणच वाढविले नसून कोरोना योद्धांबद्दल ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग आहे. पश्चिम रेल्वेच्या विविध उपनगरी स्थानकांवर आणखी अनेक अशा प्रकारचे सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा करत आहोत.