Join us

Coronavirus: 'मुंबईतील तो रुग्ण कोरोनामुळेच दगावल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:43 PM

Coronavirus: मुंबईतील एका कोरोनाबाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्याचे नेमके कारण कोरोना असल्याचे अजून सिद्ध झालेले नाही.

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, मुंबईत दगावलेला हा रुग्ण नेमका कोरोनामुळेच दगावला का, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याची पुष्टी झाल्यावरच त्याबाबत प्रतिक्रिया देता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

हिंदुजा रुग्णालयातील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्‍तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील हा कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी असल्याचे सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे, असेही म्हटले. या व्यक्तीला 8 मार्च रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो रुग्ण पेशानं एक व्यावसायिक होता. दुबईचा प्रवास करून तो मुंबईत आला होता. त्यानंतरच्या पुढील उपचारांसाठी त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर कस्तुरबा रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

मुंबईतील एका कोरोनाबाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्याचे नेमके कारण कोरोना असल्याचे अजून सिद्ध झालेले नाही. त्याची पुष्टी झाल्यावरच त्याबाबत प्रतिक्रिया देता येईल, असे टोपे यांनी म्हटले. तसेच, मुंबईत सध्याच्या स्थितीत कोणी आंदोलन करू नये. आंदोलनांमुळे होणारी गर्दी विचारात घेता, हे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत, विलगीकरण वॉर्ड स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या संशयित रूग्णांना वा बाहेरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना, विलगीकरण कक्षात राहायचे नसेल त्यांनी खाजगी रूग्णालयाऐवजी काही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहे, त्याचे पैसे रूग्णांना द्यावे लागतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. जुन्या मास्क, सॅनिटायजरची विक्री करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबईकोरोनाराजेश टोपेमृत्यूहॉस्पिटल