मुंबई: कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई धोक्याच्या वळणाकडे चालली आहे. काही मुंबईकर नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे नाइट कर्फ्यू किंवा अंशतः लॉकडाऊनबाबत दोन दिवसांत राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.लॉकडाऊन टाळायचा असल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि मास्क लावा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले. लोकांकडून नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, याचा पुनरुच्चार महापौरांनी केला.
सतराशेहून अधिक रुग्णमुंबईत सोमवारी दिवसभरात १,७१२ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ६५९ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ५३५ झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर पोहोचला आहे.