coronavirus: मुंबई ते दिल्ली ‘राजधानी’ धावली; दीड हजार प्रवाशांचा रेड झोनमधून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:56 AM2020-05-13T07:56:14+5:302020-05-13T07:56:34+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र देशात अडकलेल्यांना मूळ गावी जाता यावे यासाठी ५० दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा रेल्वे सुरू केलीे.
मुंबई : मुंबई आणि दिल्लीत सध्या रेड झोन आहे. या रेड झोनमधून प्रवासी विशेष ट्रेन असलेली राजधानी एक्स्प्रेस मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावरून सुटली. प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्यानंतरच ट्रेनमध्ये बसण्यास परवानगी देण्यात आली. या ट्रेनमधून सुमारे १ हजार ४८७ प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र देशात अडकलेल्यांना मूळ गावी जाता यावे यासाठी ५० दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा रेल्वे सुरू केलीे. पहिल्या टप्प्यात देशातील ३० वातानुकूलित ट्रेन सुरू झाल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्ली ते दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी सोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्थानकांवरून दिल्लीसाठी सुटतील. मंगळवारी मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’प्रमाणे ट्रेन धावली. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि ५ द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहेत.
नवी दिल्लीकडे प्रवास करण्यासाठी प्रवासी मुंबई सेंट्रल स्थानकावर दुपारी १२ वाजल्यापासून जमा झाले होते. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस स्थानकावर तैनात होते. याशिवाय स्थानकावर ६ वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे प्रवाशांसह त्यांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. प्रत्येक प्रवाशाने मास्क घातला होता. रेल्वे डब्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आसन व्यवस्था केली होती.
या विशेष ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ, जेवण देण्यात येणार नाही. प्रवासी स्वत:चे जेवण, पिण्याचे पाणी व अंथरूण-पांघरूण घेऊन आले होते. तिकीट दरातून कॅटरिंगचे दर वजा करण्यात आले आहेत. त्यानुसार तृतीय श्रेणी एसीसाठी १ हजार ७९५, द्वितीय श्रेणी एसीला २ हजार ५८५ रुपये असा तिकीट दर आहे.
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ट्रेन बोरीवली, सुरत, बडोदा, रतलाम, नागडा आणि कोटा स्थानकांत थांबेल.
असा करणार प्रवास
मुंबई सेंट्रल स्थानकातून १ हजार १०७ प्रवासी ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर सुरत येथून ९७, बडोदा येथून ८३, रतलाम येथून २३ आणि कोटा येथून १७७ प्रवाशांनी विशेष ट्रेन असलेल्या राजधानीमधून नवी दिल्लीसाठी प्रवास केला.