मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. भारतात ओमायक्रॉनचा(Omicron) शिरकाव झाल्यापासून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची तिसरी लाट धडकणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवार मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. याठिकाणी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या दुप्पटीने रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ओमायक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
सोमवारी राज्यात कोरोनाचे ३३ हजार ४७० रुग्ण आढळले. त्यातील १३ हजार ६४८ रुग्ण मुंबईत सापडले. मुंबईत २७ हजार २१४ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले. रविवारच्या तुलनेत सोमवारी ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत सलग ३ दिवस कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या वर जात होती. परंतु रविवारी ही संख्या २० हजारांच्या कमी आली. सोमवारी रुग्णसंख्या एक तृतीयांश कमी झाली. रुग्णसंख्या कमी होण्यामागे कमी टेस्टिंगचं कारण दिलं जात आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी ९ हजार चाचण्या कमी झाल्या.
महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार, मागील ३ दिवसांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी ६ हजार ०३, रविवारी ८ हजार ६३ तर सोमवारी २२ हजार २१४ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत रविवारी कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला तर सोमवारी या संख्येत घट होऊन ५ झाली. सोमवारी विनालक्षण असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. मागील २ दिवसांत ८२ टक्के रुग्ण विनालक्षण असणारे होते. सोमवारी ८३ टक्के रुग्ण विनालक्षण असणारे आढळले. काही दिवसांपासून १ हजाराहून अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. त्यातील १०० पेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. सोमवारी ७९८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील केवळ ४६ रुग्ण ऑक्सिजनची गरज भासली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १ लाख ६८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान २७७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ६९ हजार ९५९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.