Join us

Coronavirus in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील 'डेड बॉडी प्रकरणा'च्या बातमीनं उद्विग्न झालेल्या नर्सचं खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:14 PM

Coronavirus News in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देसायन हॉस्पिटलमध्ये जिथे रुग्णांवर उपचार केले जातात, त्याच वॉर्डमध्ये मृतदेह ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.सरकार, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभारावर टीकेची झोड उठली होती.रुग्णालय प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा पत्रातून करण्यात आलाय.

मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्याने खळबळ उडाली होती. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला होता आणि स्वाभाविकच सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांनी त्यावरून बातम्या केल्या होत्या. सरकार, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभारावर टीकेची झोड उठली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची बदली करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर, सायन हॉस्पिटलमध्ये 15 वर्षं कार्यरत असलेल्या अधिपरिचारिका सीमा राजेश कांबळे यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. रुग्णालय प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ते असं.... 

नमस्कार

मी सायन रुग्णालयातील अधिपरिचरिका...

Sion रुग्णालयातील, KEM रुग्णालयातील परिस्थिती मीडियाने ज्याप्रकारे मीठ मसाला लावून दाखवली... फार वाईट वाटले... असो ती त्यांची रोजी- रोटी आहे... पण ती अवस्था का? ही सत्यस्थिती जर लोकांपर्यंत पोहोचली असती तर बरे वाटले असते... जशी News Viral झाली; प्रत्येकाने आम्हाला Forward करून विचारले, हे खरे आहे का?...आणि आम्हीही न डगमगता उत्तर दिले... 'होय हे खरे आहे!'

तुम्हाला माहित्येय? अखंड भारतात KEM आणि Sion ही दोन रुग्णालये नामवंत आहेत. बॉम्ब ब्लास्ट असो, 93च्या दंगली असो वा 26 जुलैचा पाऊस... असे अनेक प्रसंग याच रुग्णालयांनी उत्तम प्रकारे सांभाळले आहेत... आणि आता covid सारख्या महामारीमध्ये देखील ते तितकेच सज्ज आहेत...

या दोन रुग्णालयांवर किती ताण आहे, याचा कधी आराखडा तरी तुम्ही घेतलाय?

रोज असे कित्येक रुग्ण आम्ही बघतोय जे इथल्या सुविधा घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि बरे होऊन आपापल्या मायदेशी परत जातात... ही दोन रुग्णालये आहेत म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आपले इलाज करू शकतात... अन्यथा Private Hospitals ची परिस्थिती सर्वांनाच अवगत आहे.

आज  2-4 डेड बॉडीज काय दिसताय किंवा एका बेडवर दोन रूग्ण काय दिसतात; लगेच बातमी मिळाली आणि ती व्हायरल पण झाली... हव्या तशा कॉमेंट्स करुन पण मोकळे झाले... 

पण ते दोन रुग्ण एका बेडवर का असतील, असा विचार नाही आला मनात कधी?... अहो आम्हाला पण हौस नाहीए एका बेडवर दोन रुग्ण ठेवायची आणि दुप्पट कामे करायची...

देशातील नंबर 1 ची झोपडपट्टी "धारावी"...!

सगळ्यात जास्त covid रुग्ण कुठे तर धारावीत...नुसतेच covid नाही तर सगळ्याच आजारांचे सगळ्यात जास्त रुग्ण धारावीत असतात... आणि असंच नाही; तर गेल्या 15 वर्षांच्या अनुभवावरुन मी हे ठामपणे सांगतेय... मग हे रुग्ण उपचारासाठी जाणार कुठे??? Sion मधेच ना??

आता विषय येतो covid चा... खरे तर तुमच्या माहितीसाठी, सायन आणि KEM ही दोन्हीही रुग्णालये non-covid आहेत. परिणामी बाकीच्या आजारांचे सर्व रूग्ण दाखल होणार इथेच आणि बाकीचे covid रुग्णालयेही पूर्णपणे भरल्याकारणाने covid positive देखील नाईलाजाने इथेच ट्रिट करावा लागतो. जागा नाहीए म्हणून रुग्ण परत पाठवायची परवानगी देखील या रुग्णालयांना नाहीए. रोजची डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत, अक्षरशः डॉक्टरांसमोर नातलग केविलवाणे चेहरे करून, हात जोडून विनंती करत असतात. जागा नाहीए हे माहीत असताना देखील जमिनीवर झोपून इलाज करून घेण्यास ते तयार असतात. कारण त्यांची परिस्थिती नसते बाहेर जाऊन इलाज करून घेण्याची.आता याला माणुसकी म्हणावे की हलगर्जीपणा हे पूर्णतः तुमच्या विचारशैलीवर निर्भर करतं.

Dead bodies

आता विचार करा, सर्वतोपरी प्रयत्न करूनही अशा परिस्थितीत जर बेडवर रुग्ण मरण पावतो तर त्याची सर्व formalities पुर्ण होईपर्यंत dead body ठेवणार कुठे? जिथे रुग्णांसाठीच जागा अपुरी पडतेय! आणि हो, रुग्ण expired झाल्यानंतर नातलगांना dead body हँडओव्हर करपर्यंत जी प्रोसीजर असते ना ती शब्दात सांगणे देखील शक्य नाहीए... आणि सांगून तुम्हाला ती कळणार पण नाही.

असो, आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आमचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडतोय. यात आमची आणि आमच्या परिवाराची काय हानी होतेय ते फक्त आम्हालाच माहीत. तुम्ही करा तुमचे काम. उद्या अजुन काहीतरी news तयार ठेवा. पण तरीही आम्ही न डगमगता आमचे कर्तव्य करण्यास सक्षमच असणार. आणि ही महाराष्ट्रातील successful रुग्णालये म्हणून कालही होती, आजही आहेत आणि उद्याही असणार.

बघा जमलेच तर पोस्ट वर विचार करा आणि नाहीच जमत असेल तर वाह्यात comments पण करू नका.

धन्यवाद!

सीमा राजेश कांबळे, अधिपरिचरिकालो. टि. म. स. रुग्णालयसायन.

आणखी बातम्याः

वाढत्या रुग्णसंख्येमुळे वाढला रुग्णालयांवर ताण, रुग्णांचे हाल सुरूच

मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार

जितेंद्र आव्हाड पुन्हा ऍक्टिव्ह; कोरोनावर मात केल्यानंतर म्हणतात...

हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

एक हजार बेडचे रुग्णालय आठवड्यात होणार, बीकेसीत युद्धपातळीवर काम सुरू

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरससायन हॉस्पिटलउद्धव ठाकरेनीतेश राणे मुंबई महानगरपालिका