Join us

CoronaVirus: मुंबईची जीवनवाहिनी बंद होऊन एक महिना पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 4:07 AM

रेल्वे प्रवाशांना येतेय आठवण; सोशल मीडियावर उद्घोषणा व्हायरल

मुंबई : कोरोनामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला लोकलची, लोकल प्रवासाची आठवण येत आहे. रोजची धक्काबुक्की, धावपळ अशा प्रवासाचे स्मरण प्रवासी करत आहेत. सोशल मीडियावरून लोकल प्रवासाची उद्घोषणा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.मुंबईची लाइफलाइन २२ मार्चपासून सामान्य प्रवाशांसाठी बंद केली. देशभरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढविला. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक ३ मेपर्यत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, मुंबईतील जीवनवाहिनी असलेली लोकल तब्बल एक महिन्यापासून बंद आहे. इतिहासात पहिल्यादाच एक महिना लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवासी नियमित लोकलचा प्रवास, प्रवासातील गमती-जमती आठवत आहेत.लोकलच्या प्रवासाची आठवण काढत काही जण ‘लोकलचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या’, ‘फलाटावर आलेली लोकल जलद लोकल आहे.’ अशा उद्घोषणेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मुंबईची लोकल १९९३ मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट, २००५ मध्ये २६ जुलै दिवशी झालेला पूर प्रसंग, २००६ मध्ये रेल्वेत घडलेला बॉम्बस्फोट असे काही प्रसंग सोडले तर मुंबईची लोकल कधीच थांबली नाही. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ लोकल सेवा बंद झाली होती. मात्र, कोरोनामुळे मुंबईची लोकल तब्बल एक बंद राहिली आहे.कर्मचाऱ्यांनी तयार केले १ लाख मास्कलोकल बंद असली तरी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी अत्यावश्यक सेवा देत आहे. यामधील कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा करण्यासाठी महिला तिकीट तपासक स्वत: मास्क शिवत आहेत. स्टेशन मास्टर रेल्वे पोलिसांना, सफाई कामगारांना सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोजचे वाटप करत आहेत. आतापर्यंत मध्य रेल्वेने एक लाख २८ लाख मास्क आणि सहा हजार लीटरहून अधिक हॅण्ड सॅनिटायझर तयार केले आहेत.मध्य रेल्वेच्या १३८ पार्सल ट्रेनया लॉकडाउन काळात रेल्वे प्रशासनातर्फे १३८ पार्सल गाड्या चालविल्या जात आहेत, ज्याद्वारे देशभरात औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत. मध्य रेल्वेने १४ एप्रिलपर्यंत १ हजार ५३० टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. ज्यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई लोकल