CoronaVirus: वातावरण स्वच्छ; अर्थव्यवस्थेवर मळभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:38 AM2020-04-23T04:38:42+5:302020-04-23T04:40:04+5:30
लॉकडाउन लागू झाल्याला आज महिना होणार पूर्ण
मुंबई : किनाऱ्याजवळ, सी-फेसला येणारे डॉल्फिन, राजभवनाच्या वनराईतून थेट पेडर रोडपर्यंत फेरफटका मारणारे मोर, निर्मनुष्य रस्ते, रेल्वे स्थानके. घटलेले प्रदूषण यामुळे नजरेच्या टप्प्यात आलेले भवताल... असे वातावरण सध्या मुंबईत आहे. कोरोना रोखण्यासाठी २२ मार्चपासून लागू केलेल्या लॉकडाउनला आज, गुरुवारी महिना पूर्ण होत आहे. त्यामुळे हे सुखावह बदल दिसत असले तरी त्याचे कौतुक करावे अशी स्थिती नाही. कोरोनाबाधितांची वाढती संख्या व उद्योग-व्यवसायावरील टांगत्या तलवारीने चिंतेच्या काळ्या ढगांचे मळभ दाटून आले आहे.
ठळक घटना
गावी जाण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर १४ एप्रिलला अचानक हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर जमा झाले. या घटनेमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले. पण मजुरांच्या सोयीसुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला.
झोपु योजना, गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी करताना कल्पकता, दूरदृष्टीच्या अभावामुळे खुराडेच उभी राहिली. तीच आता हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे धोरणच बदलण्याची गरज असल्याचे विधान रतन टाटा यांनी केले.
२० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये सशर्त सवलत देण्यात आली. मात्र, त्यामुळे रस्त्यावरील गर्दी वाढल्याने दुसºयाच दिवशी मुंबईतील सवलत रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पालघर जिल्ह्यात दमणच्या सीमेवर चोर असल्याच्या संशयातून जमावाने दोन साधूंच्या केलेल्या हत्येचा मुद्दाही देशभर गाजला.