मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून सात हजारांवरुन एका दिवसांत ही संख्या साडेपाच हजारांच्या टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे मागील २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही अधिक असल्याची माहिती पालिकेने दिली.
मुंबईत शनिवारी ५ हजार ८८८ रुग्णांचे निदान झाले असून ७१ मृत्यूंची नोंद झाली. तर शुक्रवारी ७ हजार २२१ रुग्ण आणि ७२ मृत्यूंची नोंद झाली होती. शहर, उपनगरात शनिवारी ८ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५ लाख २९ हजार २३३ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १०९ आहे. तर आतापर्यंत १२ हजार ७१९ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मुंबईत १७ एप्रिल ते २३ एप्रिल काळात कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.२६ टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात ३९ हजार ५८४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ५२ लाख ३ हजार ४३६ कोरोना चाचण्या पालिकेने केल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के आहे. सध्या झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात १२२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत.
खासगी वाहनांवरील ‘कलर कोड’चा निर्णय सहा दिवसांतच रद्द
निर्बंधांच्या काळात रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांवरील नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर कलर काेड म्हणजेच रंगीत स्टिकर लावण्याचा निर्णय मुंबई पोलिसांना घेतला होता. रविवारपासून याची अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र अवघ्या सहा दिवसांत हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
मुख्य वाहतूक नियंत्रण कक्षातून शुक्रवारी रात्री त्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या. आता सरसकट सर्व वाहनांची तपासणी केली जाईल. सामान्य नागरिकांकडून स्टिकरचा गैरवापर वाढल्याने अनेक ठिकाणी तपासणीवेळी पोलिसांबरोबर वाद होऊ लागले हाेते. त्यामुळे कलर कोड वापराचा निर्णय रद्द करण्यात आला. पोलीस उपायुक्त (अभियान) एस. चैतन्या यांनी शुक्रवारी याबाबत नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर आता सर्व वाहनांची तपासणी हाेईल.