मुंबई : गेल्या २० दिवसात मुंबईतील काेराेनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत १,२४४ ने वाढ झाली आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधी १९३ दिवसांनी कमी झाला आहे. वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता १ फेब्रुवारी रोजी ३२८ रुग्ण आढळून आले होते. २० फेब्रुवारी रोजी ८९७ रुग्ण आढळून आल्याने २० दिवसांत दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत ५६९ची वाढ झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी ५६५६ सक्रिय रुग्ण होते. २० फेब्रुवारी रोजी ६९०० सक्रिय रुग्ण आहेत. २० दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत १२४४ ने वाढ झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. २० फेब्रुवारीला रुग्ण दुपटीचा कालावधी ३७१ इतका झाला आहे. गेल्या २० दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी १९३ दिवसांनी कमी झाला आहे.
शहर, उपनगरात रविवारी ९२१ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १९ हजार १२८ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ४४२ झाला आहे. सध्या ७ हजार २७६ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर, उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३४६ दिवसांवर पोहोचला आहे.
१४ ते २० फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२० टक्के आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनाच्या ३१ लाख ३३ हजार ४२९ चाचण्या झाल्या आहेत. शहर, उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ६८ असून सक्रिय सीलबंद इमारती १ हजार १७ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ७ हजार ७० सहवासितांचा शोध घेतला आहे.