मुंबई: राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 758 वर पोहोचली आहे. तर मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ पाहता जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून अन्य कोणतीही दुकाने उघडण्यास मनाई करणारा आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढला होता. मात्र या आदेशात बदल करुन आता मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.
प्रवीण परदेशी यांनी पत्राद्वारे सांगितले की, जीवरक्षक वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्यानं त्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री पुन्हा एक सुधारित आदेश काढत मुंबईतील हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने सुरू ठेवण्यास अनुमती देत असल्याचे प्रवीण परदेशी यांनी सांगितले. मात्र या आदेशात एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी असल्याचे प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या संबंधित प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांना सुचना दिल्या असल्याचे प्रवीण परदेशी यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
3 मेनंतर मुंबई रेड झोनमध्ये असूनही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार काही अटींसह दुकाने आणि वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, वाईन शॉपच्या बाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. यानंतर प्रवीण परदेशी यांनी 5 मे रोजी परिपत्रक काढून मद्य आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.