मुंबई: कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत असून त्याचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अतिशय धीरोदात्तपणे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा मुकाबला करताना अनेक पोलिसांना या विषाणूनं गाठलं. मात्र त्यावर मात करून ते पुन्हा सेवेत रूजू झाले. खार पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस नाईकानं तर सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. कोरोनामुळे आई गमावल्यानंतर पोलीस नाईक भिवाजी परब यांनी प्लाज्मा दान केला. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोनाला हरवून कर्तव्यावर परतलेल्या खार पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी प्लाज्मा दान करत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक महत्त्वाचं योगदान दिलं. खार पोलीस ठाण्यातील १८ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ४ अधिकारी आणि १४ अंमलदार यांचा समावेश आहे. यातील १७ जण पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले आहेत. यापैकी पोलीस नाईक भिवाजी परब यांनी कोरोनामुळे त्यांची आई गमावली. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. मात्र सर्व संकटांवर मात करून ते पुन्हा सेवेत परतले.'मे महिन्यात मला कोरोनाची लागण झाली. मग आईदेखील कोरोनाबाधित झाल्याचं चाचणीतून समजलं. आम्हा दोघांवर अंधेरीतल्या सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आईचं निधन झालं,' अशा शब्दांत परब यांनी त्यांच्यावर कोसळलेलं संकट 'लोकमत'ला सांगितलं. 'आईच्या जाण्यानं खूप मोठा धक्का बसला. मी तणावात होतो. पण कुटुंबीयांनी, पोलीस दलातल्या मित्रांनी मला आधार दिला. त्यामुळे कोरोनावर मात करून कर्तव्यावर परतलो. त्यानंतर प्लाज्मा दानाबद्दलची माहिती मिळाली आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं प्लाज्मा दान केला,' असं परब म्हणाले.कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये प्लाज्मा अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी प्लाज्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन परब यांनी केलं. 'आम्ही पोलीस दलात कार्यरत आहोत. त्यामुळे आम्हाला अनेकदा सर्वसामान्यांसाठी काम करण्याची, त्यांचा जीव वाचवण्यासची संधी मिळते. पण प्रत्येकाला ही संधी मिळेलच असं नाही. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ती संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी प्लाज्मा दानासाठी पुढे यावं,' अशी भावनिक साद त्यांनी घातली.खार पोलीस ठाण्यातील कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांनी प्लाज्मा दान करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. त्यात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 'कोरोनावर मात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लाज्मा दान करावा यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी संपर्क साधला. त्यानंतर मी कोरोनातून बऱ्या झालेल्या कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांना प्लाज्मा दानाचं महत्त्व सांगितलं. सर्व कर्मचारी यासाठी स्वेच्छेनं तयार झाले,' अशी माहिती काब्दुले यांनी दिली. पोलिसांनी प्लाज्मा दानासाठी पुढाकार घेतल्यानं आता कोरोनावर मात करून आलेले सर्वसामान्य नागरिकदेखील प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे सरसावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
CoronaVirus News: कोरोनामुळे आईचा आधार गमावला; संकटावर मात करून कोविड योद्धा प्लाज्मादानासाठी सरसावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 7:00 AM