मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न होत असताना ड्रोनचीही त्यांना मदत होताना दिसते आहे. गर्दीच्या ठिकाणी बोलके ड्रोन फिरताच ‘ड्रोन आला रे...’ म्हणत नागरिकांची पळापळ होतानाचे चित्र पाहावयास मिळते आहे. मुंबई पोलिसांकडे एका अद्ययावत ड्रोनसह एकूण ३ ड्रोन आहेत. यात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखीन ७ ड्रोनची भर पडत एकूण १० ड्रोनची नजर मुंबईवर आहे.वरळी कोळीवाडा, धारावी, गोवंडीचे शिवाजीनगर, मालवणी, मालाड अशा विविध ठिकाणांसह गर्दीची संभाव्य ठिकाणे, झोपडपट्टीसह महत्त्वाच्या ठिकाणी या ड्रोनद्वारे नजर ठेवत नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या ड्रोनद्वारे विनाकारण रेंगाळणाऱ्या, रस्त्याकडेला थांबलेल्या प्रत्येकाचे चित्रण करत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे ड्रोनमुळे आपल्यावर कारवाई होऊ शकते ही भीती निर्माण होत आहे. सध्या १० ड्रोनद्वारे मुंबईवर नजर असल्याच्या वृत्ताला पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला.
CoronaVirus: विनाकारण भटकणाऱ्यांवर ड्रोन ठरतोय प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 1:40 AM