मुंबई : कोरोना रुग्णांची मुंबई आणि पुण्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन या भागात १८ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. मुंबईत रोज दोनशे ते चारशे या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत आहे. तर पुण्यात गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. औरंगाबादमध्येदेखील रुग्णांची संख्या सोमवारपासून अचानक वाढली आहे. हे लक्षात घेता ३ मेनंतर पूर्णपणे लॉकडाउन काढणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या मते जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत, त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी कायम ठेवून लॉकडाउनमधून सूट दिली जाऊ शकते. तर आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांना कंटोन्मेंट एरिया वगळता काही प्रमाणात मोकळीक दिली जाईल.>मजुरांना मूळ राज्यात पाठविण्याबाबतही विचार३ मेनंतर ज्या जिल्ह्यांमध्ये मजूर अडकून पडले असतील, त्यांनी जर गाडीची व्यवस्था केली तर अन्य राज्यांत जाण्याची परवानगी देण्यावर विचार सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड या राज्यांमधील महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना परत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला जात आहे. ३ मेनंतर अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविणे आणि पुण्या-मुंबईसह रेड झोनमधील लॉकडाउन कालावधी वाढविणे, या दोन्ही पातळीवर मंत्रालयीन स्तरावर जोरदार पूर्वतयारी सुरू झाली आहे. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व अन्य भागांतील काही उद्योगांना परवानगी दिली आहे. मुंबईतही पावसाळी कामांची सुरुवात सोमवारपासून झाली आहे. विजेच्या तारांमध्ये येणारी झाडे कापण्यापासून ते अनेक छोटी-मोठी कामे पालिकेच्या वतीने होत आहेत.
CoronaVirus: मुंबई, पुण्यातील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:03 AM