मुंबई : जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाचा प्रभाव आता कुठे कमी होत असला तरी त्याचा बीमोड पूर्णत: झालेला नाही. परिणामी, भविष्यातील मुंबई किंवा कोरोनानंतरची मुंबई कशी असेल, इथल्या पायाभूत सेवा-सुविधांसह आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत काय बदल करता येतील. किंवा या सर्वांना एकत्र करत मुंबई पुन्हा कशी उभी करता येईल? याचा एक अहवाल मुंबईच्या अभ्यासकांनी तयार केला आहे.
यात सरकारी अधिकाऱ्यांसह मुंबईतल्या प्रत्येक विषयाचे अभ्यासक असून, हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. कोरोनानंतरच्या मुंबईच्या शाश्वत विकासासाठी, आव्हाने स्वीकारण्यासाठी कृती आराखड्यात विविध विषयांवर भर देण्यात आला आहे.आरोग्याच्या पायाभूत सेवा-सुविधा, निधी, विकास, माहिती संकलन, पायाभूत सेवा-सुविधा आणि सरकार, महापालिकेचा अर्थसंकल्प, विशेष प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प, परवडणारी घरे, झोपड्या, मध्यम वर्गीय, विद्यार्थी, गरीब, कमी उत्पन्न असलेला वर्ग, स्थलांतरित, कोळीवाडे, गावठाण, मानसिक आरोग्य, शहरी गरीब, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक क्षेत्र, बेस्ट बस, रस्त्यांची दुरुस्ती आणि व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीसाठी तंत्रज्ञानाचा आधार, मुंबईतल्या पार्किंगचा प्रश्न, पर्यावरण, भाडेतत्त्वावील घरे अशा अनेक विषयांना कृती आराखड्यात स्थान देण्यात आले आहे.
मुंबईच्या अभ्यासकांमध्ये मुंबई हेरिटेज कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. रामनाथ झा, शहर नियोजन अभ्यासक प्राची मर्चंट ओआर एफच्या अभ्यासक सायली उदास-मंकीकर, गौतम चटर्जी, महेश पालकर यांसारख्या दिग्गजांनी कृती आराखड्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मुंबईच्या अभ्यासकांनी तयार केलेल्या कृती आराखड्यात मुंबई आणि आरोग्य, मुंबई आणि गृहनिर्माण, मुंबई आणि वाहतूक, मुंबई आणि शिक्षण, मुंबई आणि अर्थशास्त्र या चार मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.