मुंबई: राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबईच्या घाटकोपरमधील एका महिलेला कोरोना झाल्याची माहिती समोर येतेय. ही महिला काल निदान झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ४३ वर पोहोचलीय. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. या दोन्ही महिला आहेत. पुणे आणि मुंबईत कोरोनाची प्रत्येकी एक महिला रुग्ण आढळून आली. पुण्यातील कोरोनाग्रस्त महिला ३२ वर्षांची असून ती नेदरलँडवरुन दुबईमार्गे भारतात आलीय. तर घाटकोपरमधील कोरोनाबाधित महिला ६८ वर्षांची असून काल कोरोनातं निदान झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानं तिला कोरोनाची लागण झाली. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १० रुग्ण सापडले आहेत. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे प्रत्येकी ८ रुग्ण आढळून आले आहेत. उपराजधानी नागपुरात कोरोनाचे चार जण रुग्ण आहेत. तर नवी मुंबई, कल्याण, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १५४ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ४३ रुग्ण आढळले असून त्यातले तिघे परकीय नागरिक आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये (२२) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशात १७, तर हरयाणात १६ कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशात तिघांचा मृत्यू झालाय. कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय.
Coronavirus: कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानं एका महिलेला बाधा; राज्यातील रुग्णांची संख्या ४३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:51 PM