CoronaVirus in Mumbai: सैफी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांचा मृत्यू; होम क्वारन्टाईन परदेशस्थ भेटायला आलेला
By अतुल कुलकर्णी | Published: March 27, 2020 05:40 PM2020-03-27T17:40:29+5:302020-03-27T19:43:39+5:30
अबिदन बहरीनवाला यांना तपासण्यासाठी सिटीस्कॅन विभागात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे डॉक्टर, कर्मचारी, रेडिओलॉजीचे प्रमुख, निवासी डॉक्टर हे सगळे डॉक्टर अबिदन यांच्या सहवासात आले आहेत.
मुंबई : सैफी हॉस्पिटल मधील सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अबिदन बहरीनवाला यांचे कोरोनामुळे निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या स्त्रावाची तपासणी खाजगी लॅबमध्ये झाली होती, शिवाय त्यांना मधूमेह ही होता व पेसमेकर बसवण्यात आला होता असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका करोनामुळे झाला ही नाही याचा शोध घेणे सुरु आहे असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
त्यांच्या घरी सात दिवसांपूर्वी लंडनहून आलेल्या परिचित व्यक्तीस ‘होम क्वॉरंटाईन’ चा सल्ला देण्यात आला होता. त्यांच्यापासून डॉक्टर अबिदन बहरीनवाला यांना लागण झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. अबिदन यांच्यामुळे सैफी मधील त्यांचे चिरंजीव व कार्डियाक सर्जन डॉ. हाफिज बहरीनवाला यांच्यासह घरातील अन्य चौघांनाही कोरोनाची लागण झाली आहे का याचीही तपासणी केली जात आहे.
डॉ. अबिदन बहरीनवाला यांना तपासण्यासाठी सैफीमधील सिटीस्कॅन विभागात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबतचे डॉक्टर, कर्मचारी, रेडिओलॉजीचे प्रमुख, निवासी डॉक्टर हे सगळे लोक डॉ. अबिदन यांच्या संपर्कात आले होते. शिवाय डॉ. अबिदन हे ज्येष्ठ डॉक्टर असल्यामुळे त्यांना भेटायला म्हणून काही लोक हॉस्पीटलमध्ये आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या जवळपास १७ ते २० आहे. त्या सगळ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. आता हे सगळे लोक अन्य कोणा कोणाला भेटले होते याचा तपास चालू आहे. सैफी हॉस्पिटलचा रेडिओलॉजी विभाग बंद ठेवण्यात आला आहे. केवळ एका व्यक्तीला सेल्फ क्वॉरंटाईन करण्यास सांगितले असताना ती सुचना त्याने न ऐकल्यामुळे मुंबईतील एका अत्यंत ज्येष्ठ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
ज्यांना होम क्वॉरंटाईन करण्यास सांगितले आहे अशांनी जर आदेश पाळले नाहीत तर काय होते याचा अत्यंत गंभीर प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. विमानतळावर ज्यांच्या हातावर शिक्के मारले होते, असे लोकही बिनदिक्कत बाहेर फिरत आहेत, त्यामुळे त्या लोकांना जोपर्यंत घरात वेगळे ठेवले जाणार नाही, तोपर्यंत ही साथ आटोक्यात येणे अशक्य आहे अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाºयांनी दिली आहे.