CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:24 AM2022-01-06T07:24:43+5:302022-01-06T07:24:48+5:30

CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबईतील ५१,४३० बेडवर फक्त ७,५८२ तर; ठाण्यात ३८,९१५ बेडवर ३,२०१ रुग्ण; धास्ती : कोरोनाचा नवा विक्रम; एका दिवसात १५ हजार रुग्ण

CoronaVirus in Mumbai, Thane: Beds empty! but seeing the speed of the corona, the closed covid center reopened | CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली

CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली

googlenewsNext

- शेफाली परब, स्नेहा मोरे, अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत कोरोना रूग्णांसाठी एकूण ५१,४३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ७,५८२ खाटांवर रूग्ण दाखल झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८,९१५ बेड उपलब्ध असून त्यातील ३,२०१ खाटांवर रूग्ण उपचार घेत आहेत, मुंबईत ३ लाख ३२ हजार ८४९ कोरोना रूग्ण घरच्या घरी उपचार घेत आहेत. ठाण्यात हिच संख्या ३,३९६ इतकी आहे. 
कोरोनाच्या रुग्ण संख्येत दररोज २० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यापैकी सुमारे ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे सध्या दररोज सरासरी पाच टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

एकूण रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन मुंबई आणि ठाण्यातील स्थानिक प्रशासनांनी बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. मुंबईत पालिका-खासगी क्षेत्रात एकूण  ३५,४८७ पैकी ५,१०४ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात एकूण बेड २४,०३८ उपलब्ध असून सध्या २,०७६ रुग्ण दाखल आहेत.

मुंबईत सध्या ३२ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत. दररोजची रुग्ण संख्या २५ हजारांवर पोहोचून यापैकी दहा टक्के बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकेल. यासाठी महापालिकेने खबरदारी म्हणून ३५ हजारांपर्यंत खाटा वाढविण्याची तयारी केली आहे. तसेच कंत्राटी पद्धतीवरही आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे. तर रुग्णालयात प्रत्यक्ष दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने ही मागणी ५० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. 
 

खाटा, ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता 
सध्या बाधित रुग्णांच्या तुलनेत दोन टक्केच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र भविष्यात ही मागणी वाढण्याची भीती असल्याने गरजेच्या तिप्पट क्षमता पालिकेने तयार करुन ठेवली आहे. 

पाचव्या दिवशीच रुग्ण कोरोनामुक्त 
लक्षणे असलेले व रुग्णालयात दाखल कोविड रुग्ण पाचच्या दिवशी बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे दररोज रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होऊन बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. प्रभावी लसीकरणामुळे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. 
- सुरेश काकाणी, 
अतिरिक्त आयुक्त, मुंबई

बूस्टर मिळेल पण कोणाला?
ज्या रुग्णांनी आधी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे त्यांना बूस्टर डोस त्यात लसीचा घ्यावा लागेल आणि ज्यांनी कोविशील्डचे दोन डोस घेतले आहेत त्यांना देखील बूस्टर डोस कोविशील्डचाच घ्यावा लागेल. ही माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या ६७२ मे. टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता असून, अजून २७० मे. टन साठवणूक क्षमता करण्यात येईल.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

रुग्णवाढीचा उच्चांक
दुसऱ्या लाटेत मुंबईत सर्वाधिक रुग्ण संख्या फेब्रुवारीमध्ये ११,२०६ वर पोहोचली होती. एप्रिलनंतर त्यामध्ये घट झाली. आता तिसऱ्या लाटेत बुधवारी मुंबईतील रुग्णसंख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. या वेगाने हा आकडा लवकरच २० हजारांवर पोहोचण्याचा पालिकेचा अंदाज आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधित रुग्ण संख्येचा उच्चांक पाहायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

nथंडीच्या मोसमातील सर्दी, पडशासारखे आजार आणि त्यात कोरोनाची धास्ती यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांकडून दवाखान्यात तपासणी करून घेण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. परिणामी खाजगी, सरकारी दवाखाने रूग्णांच्या गर्दीने फुल्ल झाल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे रूग्णांना आपला नंबर येईपर्यंत चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे तर दुसरीकडे डॉक्टरांवरील ताणही वाढला आहे. 

...तरच लाट नियंत्रणात येईल
मुंबईत एकूण ३,३२,८४९ तर ठाण्यात ३,३९६ घरच्या घरी उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण खरोखरच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत की कमी लक्षणे असलेले रूग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत यावर कुणाचेच नियंत्रण नाही. 
nत्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याचे आढळताच नागरिकांनी घराबाहेर न पडता आवश्यक उपचार करून घ्यावेत. तरच कोरोना संसर्गाला आळा बसून लाट आटोक्यात येईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
 

Web Title: CoronaVirus in Mumbai, Thane: Beds empty! but seeing the speed of the corona, the closed covid center reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.