मनोहर कुंभेजकर
मुंबई - वांद्रे ते दहिसर पूर्व अशा विस्तीर्ण पसरलेल्या व सुमारे 65 लाख लोकवस्ती असलेल्या पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा रविवारी संध्याकाळपर्यंत 361 वर गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे आता 71 रुग्ण झाले आहेत.
पश्चिम उपनगरात अजूनही नागरिक विनाकारण किराणा, भाजी व फळे विकत घेण्यासाठी बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कशी घालायची हा पोलीस यंत्रणा व पालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे. गेल्या रविवारी पहाटे 4 पर्यंत अंधेरी पूर्व, विजयनगर येथे असलेल्या डी मार्टला सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजवत तब्बल 500 ते 600 नागरिक सामान घेण्यासाठी हजर होते अशी माहिती शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा संघटक नितीन डिचोलकर यांनी लोकमतला दिली. त्यामुळे नागरिक कोरोना की किराणा घरी बरोबर घेऊन जात आहे का? असा सवाल त्यांनी केला.
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम या भागांचा मिळून के पश्चिम वॉर्ड असून येथे कोरोनाचे 77 रुग्ण झाले असून हाय रिस्क कोरोना रुग्ण 325 आहेत. पी दक्षिण मध्ये 24 व पी उत्तर मध्ये 53 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्डमधील आता कोरोनाचे 154 रुग्ण झाले आहेत.
के पश्चिम हा सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिमपर्यंत पसरलेला मोठा वॉर्ड आहे. पालिकेच्या नकाशावर हा कोरोनाचा हॉट स्पॉट असून येथे कोरोनाचे तब्बल 77 रुग्ण आहेत. त्या खालोखाल एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 71 रुग्ण आहेत. तर मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरार पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्ड मध्ये कोरोनाचे 53 रुग्ण झाले आहेत.
पालिकेच्या वॉर्ड विभागणीनुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व,एच पश्चिम,के पूर्व,के पश्चिम,पी दक्षिण,पी उत्तर,आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात. पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 77 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्या खालोखाल एच पूर्व मध्ये 71, पी उत्तर मध्ये 53, एच पश्चिम मध्ये 26, के पूर्वमध्ये 49,आर दक्षिणमध्ये 30, पी दक्षिणमध्ये 24, आर मध्यमध्ये 17 व आर उत्तरमध्ये 14 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 361 रुग्ण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक
देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे