मुंबई: कल्पकतेच्या जोरावर आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुंबई विद्यापीठाने पूर्वनियोजित शॉर्ट-टर्म कोर्सेस रद्द न करता त्याचे यशस्वी आयोजन करून नवीन पायंडा पाडला आहे. मुंबई विद्यापीठात १२ ते १८ मार्च २०२० दरम्यान युजीसी-एचआरडीसी मार्फत शिक्षकांसाठी शॉर्ट-टर्म कोर्सेसचे आयोजन केले होते. मात्र देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करत विद्यापीठाने हे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द न करता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचे यशस्वी आयोजन केले आहे.गुगल मीट या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यापीठाने या कार्यक्रमातील सहभागी आणि मार्गदर्शक दोघांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सत्राचे नियोजन केले. मूक्स अँड इ-लर्निंग या कोर्सेससाठी एकूण २१ प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता, यातील १५ प्राध्यापक हे विद्यापीठाच्या सलग्नित महाविद्यालयातील तर उर्वरित ६ प्राध्यापक हे इतर विद्यापीठातील होते, तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी गुगल, सीडॅक आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. विद्यापीठाकडे असलेल्या गुगल स्यूटच्या माध्यमातून विद्यापीठात पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग केला गेला असून इतर शैक्षणिक कार्यातसुद्धा या सुविधेचा अधिकाधिक लाभ घेण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मूक्स अँड इ-लर्निंग या ऑनलाईन सत्राचे नियोजन प्रा. मंदार भानूशे यांनी केले.