CoronaVirus Mumbai Updates: मुंबईकरांनो सावधान! गेल्या आठवडाभरात दर तासाला १४८ कोरोनाबाधितांची नोंद; ५५१ सक्रिय सीलबंद इमारती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:00 PM2021-03-28T13:00:51+5:302021-03-28T13:01:00+5:30

CoronaVirus Mumbai Updates: रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे.

CoronaVirus Mumbai Updates: 148 corona patients recorded per hour during the last week in mumbai; 551 active sealed buildings | CoronaVirus Mumbai Updates: मुंबईकरांनो सावधान! गेल्या आठवडाभरात दर तासाला १४८ कोरोनाबाधितांची नोंद; ५५१ सक्रिय सीलबंद इमारती

CoronaVirus Mumbai Updates: मुंबईकरांनो सावधान! गेल्या आठवडाभरात दर तासाला १४८ कोरोनाबाधितांची नोंद; ५५१ सक्रिय सीलबंद इमारती

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात ३५ हजार ७३६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १६६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ७३ झाला आहे. तर, ३ लाख ३ हजार ४७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक १६६ दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, २३ मार्च रोजी १३१ मृत्यूंची नोंद झाली होती. मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला.

राज्यात शनिवारी १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण २.२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९१ लाख ७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ८८ हजार ७०१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 

मुंबई  गेल्या आठवडाभरात दर तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सलग तीन दिवस ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर शनिवारी शहरात ६ हजार १२३ रुग्णांची नोंद झाली, तर बळींचा आकडा १२ आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ७५१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्या १२ रुग्णांपैकी ९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि ५ महिलांचा यामध्ये समावेश होता. ८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. 

गेल्या २४ तासांत २ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ५५५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. दिवसभरात ४८ हजार ७५ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ३९ लाख ३६ हजार ९३० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. २० मार्च ते २६ मार्चपर्यंत एकूण कोरोना वाढीचा दर १.०६ टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६३ दिवस आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या ५३ सक्रिय झोन असून ५५१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील आठवडाभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा-

२० मार्च - २७४६

२१ मार्च - ३४९७

२२ मार्च - ३०२७

२३ मार्च - ३२४५

२४ मार्च - ४९०७

२५ मार्च - ५१८७

२६ मार्च - ५५१३

राज्यात ५५ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण-

राज्यात शुक्रवारी २ लाख ६५ हजार ८६२ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात २ लाख ३१ हजार ५१८ जणांना कोविशिल्ड, तर ३४,३४४ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ३१ हजार ३२४ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ४८ हजार ६९४ जणांना लस देण्यात आली. लसीकरणात मुंबई आघाडीवर आहे. त्याखालाेखाल पुणे ६ लाख ६० हजार २९१, तर ठाणे येथे ४ लाख २२ हजार ६२३ जणांनी लस घेतली. नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये ३ लाख ३३ हजार ३४५ जणांचे तर नाशिकमध्ये २ लाख ५४ हजार २५८ जणांचे लसीकरण करण्यात आले.

Web Title: CoronaVirus Mumbai Updates: 148 corona patients recorded per hour during the last week in mumbai; 551 active sealed buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.