CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:27 PM2021-04-24T12:27:23+5:302021-04-24T12:31:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : हवेतील ऑक्सिजन निर्माण करुन दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे

CoronaVirus Mumbai Updates 43 metric tons of oxygen will be produced in 12 hospitals of BMC | CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार

CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार

Next

मुंबई - ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने महापालिकेने आता स्वतः ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प येत्या महिन्याभरात उभारण्यात येणार आहेत. हवेतील ऑक्सिजन निर्माण करुन दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग अधिक असल्याने अधिक क्षमतेने (लीटर प्रति मिनीट) ऑक्सिजन रुग्णांना पुरवावा लागतो. मात्र ऑक्सिजन उत्‍पादक आणि वाहतुकदारांच्या क्षमता आणि ऑक्सिजन उत्‍पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्‍या मर्यादा असल्याने मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना राज्य सरकार व पालिका प्रशासन यांची कसरत होत आहे. 

याचा फटका मुंबईलाही बसत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये खाजगी आणि पालिका रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यावर रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागत आहे. यामुळे पालिका आणि वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत असल्याने पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचा निर्णय आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. 

प्रकल्पाचा खर्च कमी...

हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे चालू शकतात. एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या संयंत्रातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनचा प्रती घनमीटर दर हा लिक्विड ऑक्सिजन दरा इतकाच आहे. तर जंबो सिलिंडरशी तुलना करता त्‍याच्‍या अर्ध्याहूनही कमी आहे. त्यामुळे पालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.

यापूर्वीही झालेला ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न.....

दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प पालिकेने उभारला आहे. तर जोगेश्‍वरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी प्रतिदिन एक हजार ७४० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्‍प उभारला आहे. या दोन्‍ही रुग्‍णालयांतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प आपत्ती काळात अत्यंत मोलाची ठरत आहेत. हे दोन्‍ही प्रकल्‍प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत.


       
महिन्याभरात प्रकल्प तयार होणार

वातावरणातील हवेतून ऑक्सिजन निर्मिती (पी.एस.ए.) तंत्राद्वारे जागेवरच ऑक्सि‍जन निर्मिती करणारे हे प्रकल्‍प असतील. हे प्रकल्प उभारण्यासाठी लघू ई-निविदा यांत्रिकी व विद्युत खात्यामार्फत काढल्या आहेत. निविदा प्रक्र‍िया पूर्ण होऊन मंजुरी मिळताच एका महि‍न्‍यात हे प्रकल्‍प उभारले जातील. १६ प्रकल्‍पातून प्रतिदिन अंदाजे ३३ हजार घनमीटर (सुमारे ४३ मेट्रिक टन) इतका ऑक्सिजन साठा निर्माण करणे शक्‍य होणार आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची प्रत्यक्ष गरज, प्रकल्पासाठी लागणारी जागा,  विद्युत पुरवठ्याची क्षमता यानुसार एक किंवा दोन यंत्रं संबंधित ठिकाणी बसविले जाणार आहेत. 

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्‍ये, कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्रकल्प कायमस्वरुपी उभे राहिल्यास ऑक्सिजन सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत मिळेल. 

- पी.वेलरासू (अतिरिक्त आयुक्त)

असा होणार ऑक्सिजन साठा तयार...

वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम  संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा कॉम्‍प्रेस केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात. या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा 'ऑक्‍स‍िजन जनरेटर' मध्‍ये संकलित केली जाते. यामध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहि‍न्‍या, पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

Read in English

Web Title: CoronaVirus Mumbai Updates 43 metric tons of oxygen will be produced in 12 hospitals of BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.