मुंबई - कोरोना प्रसार वाढत असल्याने मुंबईत सोमवारपासून कडक निर्बंध आणि वीकेंडला लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने मागविलेले जेवण व अत्यावश्यक पुरवठ्याची घरपोच सेवा २४ तास सुरू राहणार आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थ व फळांच्या स्टॉलवरून लॉकडाऊनच्या काळात पार्सल घेण्यास परवानगी असणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे महापालिकेने बुधवारी सुधारित परिपत्रक काढून ऑनलाइन घरपोच सेवांना परवानगी दिली आहे. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने झोमॅटो, स्विगी अशा सेवांद्वारे घरपोच जेवण मागण्यास सर्व दिवस २४ तास परवानगी असणार आहे. मात्र शनिवार-रविवार लॉक डाऊनच्या काळात हॉटेलमध्ये जाऊन पार्सल न घेता घरपोच सेवांना परवानगी असेल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉक डाऊनच्या काळात रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थांचे व फळांच्या स्टॉलवरून पार्सल घेण्यास परवानगी असणार आहे. मात्र त्या ठिकाणी उभे राहून खाण्यास मनाई करण्यात आली आहे.
यांना असेल सूट...
- विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट घेऊन प्रवास करावा. तसेच त्यांच्याबरोबर एका पालकाला प्रवासाची परवानगी असणार आहे.
- स्वयंपाकी, वाहन चालक, घरकाम करणारे, परिचारिका आणि ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तीची सेवा करणाऱ्यांना सकाळी सात ते रात्री दहापर्यंत सातही दिवस प्रवास करण्याची परवानगी असेल.
- नेत्र चिकित्सालय आणि चष्म्याची दुकाने राज्य सरकारने निश्चित केलेल्या वेळेनुसार सुरू ठेवण्याची परवानगी असेल.