Join us

Coronavirus Mumbai Updates: नकार देता येणार नाही, चाचणी करावीच लागणार; दिवसभरात ४७ हजार चाचण्यांचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 2:17 AM

मुंबई पालिकेचा अँटिजन चाचणीवर भर

मुंबई : मुंबईत काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता गर्दीच्या ठिकाणी चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमध्ये मुख्य भर हा अँटीजन चाचण्यांवर देण्यात येत असून, दिवसाला जवळपास ४७ हजार चाचण्यांचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.

शहर, उपनगरात जवळपास २७ माॅल्स आहेत. प्रत्येक माॅलमध्ये ४०० व्यक्तींच्या कोरोना अँटीजन चाचण्या करण्यात येतील. म्हणजे दिवसाला जवळपास १० हजार ८०० चाचण्या करण्यात येतील. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरही दररोज किमान १००० जणांच्या चाचण्या करण्यात येणार असून, दिवसाला ९ हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील अन्य गर्दीच्या ठिकाणी बस आगार, मार्केट-मंडया येथे एक हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार असून दिवसभरात ४ हजार चाचण्या करण्यात येतील. माॅल्सखेरीज अन्य ठिकाणच्या चाचण्यांचे दर महापालिका प्रशासनाकडून देण्यात येतील. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्या २० हजारांवरून ५० हजारांवर नेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

नकार देता येणार नाही, चाचणी करावीच लागणारमुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा साडेतीन हजारांवर पोहोचला आहे. मात्र येत्या काही दिवसांत शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत पोहोचेल, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मुंबईचा काेराेना पाॅझिटिव्हिटी दर १२ टक्क्यांवरून १६.८ टक्क्यांवर गेला आहे, तसेच फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात ४५५ वर असणारा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी कमी होऊन तीन महिन्यांवर आल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या या चाचण्यांना मनाई केल्यास साथरोग अधिनियम, १८९७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

४० टक्के काेराेनाबाधित रुग्ण रुग्णालयातमहापालिका रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये मिळून सध्या १३,०८४ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी आजच्या दिवशी ५,१४४ खाटा या रिक्त आहेत. अतिदक्षता विभागात १,५२९ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ४९१ खाटा आजही रिकाम्या आहेत. यामागे सध्या आढळणाऱ्या काेरोना रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. सध्या लक्षणे असलेले ४० टक्केच काेरोना रुग्ण असून, त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका