Join us

Coronavirus Mumbai Updates : डेल्टा प्लसचा चाचणी अहवाल 2 दिवसांत मिळणार, कस्तुरबा रुग्णालयात चाचणी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 8:17 PM

Coronavirus Mumbai Updates: अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन दोन आठवड्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळू शकणार आहे. 

मुंबई - डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्यासाठी सध्या मुंबईतील नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. तिथून अहवाल येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात 'डेल्टा प्लस' चाचण्या करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन दोन आठवड्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळू शकणार आहे. 

फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला. या संसर्गाचे प्रमाण आता पूर्णपणे नियंत्रणात येत असताना डेल्टा प्लस रुपी संकट मुंबईवर ओढावले आहे. कोरोनाचे बदललेले स्वरूप असलेल्या डेल्टा प्लसच्या संशयित ६०० रुग्णांचे अहवाल पालिकेला मिळाले आहेत. डेल्टाचा संसर्ग झालेला आतापर्यंत केवळ एक रुग्ण आढळला असून तो बरा झाला आहे. परंतु, खबरदारी म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे.  

सध्या अशा वेगळ्या विषाणूंच्या 'जिनोम सिक्वेन्स’साठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी’ या संस्थेकडे संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवली जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. 'डेल्टा प्लस' वेगाने पसरण्याचा धोका असताना हा विलंब मुंबईसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पालिकेने 'डेल्टा प्लस'सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुठे होणार चाचण्या... 

'डेल्टा प्लस' हा कोरोनापेक्षा वेगाने पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी, वस्ती किंवा परिसरात झपाट्याने एकाच प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास किंवा एखादा मृत्यू संशयित विषाणूजन्य आढळल्यास त्या भागात अशा चाचण्या केल्या जाणार आहेत. एका दिवसात दोनशे ते तीनशे चाचण्या होऊ शकतील. मात्र ही चाचणी खर्चिक असल्याने सरसकट केली जाणार नाही. 

 'डेल्टा प्लस'सह अशाच प्रकारचे वेगळे विषाणूंच्या चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अत्याधुनिक मशीन आणली जात आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत अहवाल मिळू शकेल. त्यामुळे बाधित रुग्णांचे निदान लवकर झाल्यास खबरदारी आणि उपचार करणे शक्य होईल.  - सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त) 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसमुंबईहॉस्पिटल