Join us  

Coronavirus Mumbai Updates : धारावी ठरतेय कोरोना हॉटस्पॉट! पहिल्या, दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा मोडला रेकॉर्ड, 'ही' आकडेवारी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 12:36 PM

Coronavirus Mumbai Updates : धारावी पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. गुरुवारी धारावीत कोरोनाचे १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. 

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने वाढत असताना मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजारांच्या घरात पोहोचला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल २०,१८१ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. याच दरम्यान आता धारावी पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. गुरुवारी धारावीत कोरोनाचे १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. 

पहिल्य़ा आणि दुसऱ्या लाटेत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या २४ तासांत धारावीमध्ये नव्या रुग्णांमध्ये २४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या येथील पॉझिटिव्हिटी रेट ११ टक्के इतका आहे. मुंबईतील धारावीत गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केला होता. त्यानंतर चिंतेत वाढ झाली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हॉटस्पॉट ठरली होती. येथील ८० टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. जी/ उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त किरण दिगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी येथील ९७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ११ टक्के लोक पॉझिटिव्ह आले. 

दादर आणि माहीममध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ

८ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ९९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. धारावीला लागूनच असलेल्या दादर आणि माहीममध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होते आहे. गुरुवारी दादरमध्ये २२३ रुग्ण व माहीममध्ये ३०८ नवीन रुग्ण आढळले आहेत. दादर हे गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणी रोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिगावकर यांनी जी/ उत्तर प्रभागात १६०० जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील ६३८ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट ४० टक्के आहे अशी माहिती दिली आहे.

मुंबई लॉकडाऊन होणार?

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेल्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं विधान महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं होतं. त्यास महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दुजोरा दिला होता. मुंबईत २० हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यानं आता शहरात लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईधारावी