Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:57 PM2021-04-29T20:57:58+5:302021-04-29T20:59:03+5:30
Coronavirus Mumbai Updates : लसीकरण केंद्रांबाहेर प्रचंड गर्दी होत असल्याने महापालिका नवीन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे.
मुंबई - लसीकरणासाठी सरकारी व महापालिका केंद्रांबाहेर मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने यापैकी अनेकांना माघारी जावे लागते. तसेच गर्दीत उभे राहिल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोवीन ॲपवर नोंदणी झाल्यानंतर लसीकरण केंद्राकडून आलेला संदेश आणि लसीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच घराबाहेर पडा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
कांजुर (पूर्व) येथील परिवार महापालिका इमारतीमध्ये असलेल्या तसेच भांडुप (पश्चिमच्या) सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण महापौरांनी गुरुवारी केले. त्यानंतर गोरेगाव येथील नेस्को लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. ही खबरदारी घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य...
लसीकरण केंद्रांबाहेर प्रचंड गर्दी होत असल्याने महापालिका नवीन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे. तरी नागरीकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले. दरम्यान, राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर याबाबतचे नियोजन करण्यात येईल. सद्यस्थितीत १५ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळण्याची शक्यता कमी आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी रांगेत उभे राहू नये....
दुसरा डोस घेण्यास थोडा विलंब झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. मात्र लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी रांगेत व गर्दीत उभे राहू नये. लसींचा साठा मर्यादित असल्याने तूर्तास अनेकांना लस उपलब्ध होत नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना डोस मिळेल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहे. सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रांची संख्या पाचशेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याने चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.