मुंबई - देशात कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल दीड कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. देशातील अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील सर्च कर्मचारी अहोरात्र कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती सांगताना मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरही भावूक झाल्या आहेत. मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ तृप्ती गिलाडा (Dr. Trupti Gilada) यांनी कोरोनाची भयंकर परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. कोरोनाचं संकट, रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे. लोकांनी काय करायला हवं यावर डॉ. तृप्ती गिलाडा यांनी व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही असं म्हटलं आहे.
"मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार झाल्यासारखं कधीच वाटलं नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण असं काही नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं काही नाही. त्यामुळे काळजी घ्या" असं डॉ. तृप्ती यांनी म्हटलं आहे.
"जर तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नका. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. असं घाबरून अनेक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाहीत आणि घरीच त्यांना ऑक्सिजन देऊन त्यांच्यावर उपचार करावे लागत आहेत. डॉक्टर्स आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील बेड्स मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. कोरोना सर्वत्र आहे. तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुम्ही नीट मास्क लावलाच पाहिजे. तुम्हाला कोरोना झाला नाही किंवा झाला असेल तरी तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाही. तसेच कोरोना लसही घ्या" असं आवाहनही डॉ. तृप्ती गिलाडा यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुंबईतील सोसायट्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठ्या सोसायट्या आणि कॉलनीत राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. तर झोपडपट्ट्यांमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वात कमी आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत 87 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यातील 90 टक्के रुग्ण मुंबईच्या सोसायटी आणि कॉलनी आणि इतर परिसरातील आहेत. बाकी उरलेले दहा टक्के रुग्ण हे मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील 79,032 रुग्ण नॉन स्लम परिसरातील आहे. तर 8411 रुग्ण मुंबईतील विविध भागातील आहेत. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला असून कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून धारावीकडे पाहिले जात आहे. जुलै 2020 मध्ये 57 टक्के केसेस झोपडपट्ट्यांमध्ये पाहायला मिळाले होते. तर 16 टक्के केसेस नॉन स्लम एरियात होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येताच सर्व चित्रं बदलून गेलं आहे. आता सोसायट्यांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत.