Join us

CoronaVirus Mumbai Updates : मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द; मुंबई पोलिसांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:06 AM

Mumbai Police discontinues the colour-coded sticker system for vehicles : अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते.

मुंबई - कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतही कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. याच दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत आता रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. 

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल. #StayHomeStaySafe" असं ट्विट केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. 

फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर फिरण्यास परवानगी असून, अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना आता रंगीत स्टीकर लावावे लागतील, त्याव्यतिरिक्त अन्य गाड्यांवर कारवाई केली जाईल असं याआधी म्हटलं होतं. डॉक्टर व आरोग्यसेवकासाठी लाल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीच्या वाहनावर हिरवा आणि सरकारी व अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावणे अनिवार्य करण्यात आले होते. वाहनाच्या पुढील व मागील बाजूला 6 इंच आकाराचे गोल स्टीकर लावायचे होते. त्याव्यतिरिक्त अन्य वाहने आणि कलर कोडचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे दिला होता. मात्र त्यानंतर आता हे बंद करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई पोलीसपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहेमंत नगराळे