Coronavirus Mumbai Updates: मुंबईतील १७ विभागांमध्ये एक हजार सक्रिय रुग्ण; हाॅटस्पाॅटची संख्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:39 AM2021-03-28T06:39:23+5:302021-03-28T06:39:39+5:30
अंधेरी ते बोरीवली परिसरात चिंता वाढली, जून २०२० मध्ये पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर महापालिकेने ‘मिशन झिरो’ सुरू केला होता.
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील २४ पैकी १७ विभागांमध्ये सध्या एक हजारांहून अधिक बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णवाढ प्रामुख्याने अंधेरी ते बोरीवली या पट्ट्यात दिसून येत आहे. पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पश्चिम उपनगरात चिंता वाढली आहे. काेरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मॉल, फेरीवाले, वॉचमन आणि गर्दीच्या ठिकाणी अँटिजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
जून २०२० मध्ये पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर महापालिकेने ‘मिशन झिरो’ सुरू केला होता. या मोहिमेअंतर्गत मोबाइल व्हॅनद्वारे नागरिकांची तपासणी केली जात होती. तसेच ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यात आली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीमदेखील प्रभावी ठरली. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी विभागात सर्वाधिक ३१०७ सक्रिय रुग्ण आहेत.
पालिकेच्या उपाययोजना...
गेल्या महिन्याभरापासून अंधेरी पूर्व - पश्चिम ते बोरीवलीपर्यंत दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेने या भागात चाचण्या वाढवून जास्तीत जास्त रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी पालिकेचे पथक गस्त घालत असून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जुहू चौपाटीवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंधही घालण्यात आले आहेत.
बोरिवलीतील इंद्रप्रस्थ मॉल, मोक्ष मॉल, मेट्रो मॉल आणि दहिसरच्या डी मार्ट, कांदिवलीच्या ग्रोवेलस मॉलच्या ठिकाणी नागरिकांनी अँटिजन चाचणी केल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्देश आहेत. या नियमाचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक विभागातील पाच पथक लक्ष ठेवून आहेत.