Coronavirus Mumbai Updates : ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; पालिकेच्या 5 रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:15 PM2021-07-02T19:15:26+5:302021-07-02T19:17:11+5:30
Coronavirus Mumbai Updates : वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.
मुंबई - कोविडच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अक्षरशः युद्ध लढल्यागत स्थिती अनुभवली आहे. त्यामुळे अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आदी उपस्थित होते.
ऑक्सिजनअभावी १६८ पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता. इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे तर पालिका आणि आरोग्य यंत्रणेचे श्रेय....
४ एप्रिल रोजी मुंबईत सुमारे ११ हजार रूग्ण होते. परंतु ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनामुळे सुदैवाने कोणीही दगावले नाही. याचे श्रेय महापालिका आणि वैद्यकीय यंत्रणेचे आहे. मुंबईतील पाच आणि अन्य दोन अशा सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारल्याबद्दल सीएसआर फंडातून सहकार्य करणाऱ्या कंपन्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
यांच्या सहकार्याने प्रकल्प...
वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मे. आरती इंडस्ट्रीज, मेसर्स घारडा केमिकल्स, मेसर्स बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मेसर्स सारेक्स फाऊंडेशन, मेसर्स अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, मेसर्स डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा. लि. आणि मेसर्स मारवाह स्टील प्रा. लिमिटेड या सात दात्यांनी मिळून सीएसआर अंतर्गत हे संयंत्र उभारण्यासाठी महापालिकेला सहकार्य केले आहे. या प्रकल्पातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे.