मुंबई - कोरोना चाचण्या कमी होत असल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत असल्याची टीका महापालिकेवर केली जात होती. मात्र गुरुवारी तब्बल ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही बाधित रुग्णांचे प्रमाण ९.९४ टक्के म्हणजेच एक अंकी असल्याचे गुरुवारी आढळून आले. तसेच कोविड बाधित रुग्णांसाठी तब्बल ५७२५ खाटा रिक्त असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी केला.
फेब्रुवारी मध्यान्हपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला. सक्रीय रुग्णांचा आकडा ९० हजारांपर्यंत पोहोचल्याने पालिका आणि खासगी रुग्णालयातही खाटा कमी पडू लागल्या होत्या. त्यामुळे पालिका प्रशासनाने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवून जवळपास २२ हजारांपर्यंत नेली.
दरम्यान, पालिकेने केलेल्या उपाय योजना आणि राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर मुंबईतील रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट दिसून येत आहे. दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आता सरासरी चार हजार इतकी आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण ४५ हजारांवरुन ३० हजारांवर आल्याने रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याचा संशय व्यक्त होत होता.
पॉझिटिव्हिटी दर एक अंकी...
१ एप्रिल रोजी मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर २०.८५ टक्के होता. तर ४ एप्रिल रोजी हेच प्रमाण सर्वाधिक म्हणजे २७. ९४ टक्के होते. त्यानंतर पॉझिटिव्हिटी दरात घट होत गेली. त्यानुसार २८ एप्रिल रोजी ११.९३ टक्के तर २९ एप्रिल रोजी ९.९४ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी ४३ हजार ५२५ चाचण्या करण्यात आल्या होत्या.
सद्यस्थितीत उपलब्ध खाटा..
पालिका आणि खासगी १७२ रुग्णालयात एकूण २१ हजार ७९६ खाटा उपलब्ध होत्या. यापैकी सध्या पाच हजार ७२५ खाटा रिकाम्या आहेत.
ऑक्सिजन खाटा..उपलब्ध १० हजार ६१६....रिकाम्या..१४७९
अति दक्षता विभाग - उपलब्ध - २८९४...रिकाम्या....५७
व्हेंटिलेटर ...उपलब्ध ...१४८२...रिकाम्या...२१
यामुळेच पॉझिटिव्हिटी दरात घट....
बाधित रुग्णांना शोधणे (चेस दि व्हायरस धोरण)विभाग स्तरावरील वॉर रूममार्फत रुग्णांना खाटा उपलब्ध करणे.जंबो फिल्ड रुग्णालयाची निर्मितीखाटांची संख्या वाढवणे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणेखासगी रुग्णालयाने दिलेले सहकार्य.मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा प्रभाव.पालिका कर्मचारी - अधिकारी यांनी दिवसरात्र केलेली मेहनत यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर कमी आणण्यात यश आले.
- इकबाल सिंह चहल (आयुक्त, मुंबई महापालिका)