मुंबई - बनावट लसीकरण रॅकेट उघड झाल्यानंतर मुंबईतील तब्बल २६०० लाभार्थ्यांना लसऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणात दोषी शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची सूचना मुंबई पोलिसांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी या रुग्णालयाला सील केले आहे. तसेच अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी सोसायट्यांमधील लसीकरणाबाबत सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कांदीवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली. अशाप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाड़ा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत लसींचा पुरवठा कांदिवली, चारकोप येथील शिवम चारकोप रुग्णालयातून केला जात असल्याचे समोर आले
एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे लसींच्या नावाखाली नेमके काय दिले? याबाबत अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवम रुग्णालयाचे परवाना रद्द करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने शुक्रवारी केली त्यानुसार हे रुग्णालय शुक्रवारी सील करण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
संबंधिताना लस देण्याबाबत पालिकेचा विचार...
बोगस लसीकरण प्रकरणात लाभार्थ्यांना देण्यात आलेली लस नेमकी काय होती? याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर संबंधिताची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच त्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र केंद्राकडून रद्द करण्याची कार्यवाही पालिकेला करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना तपासून त्यांना पुन्हा लस देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.