CoronaVirus In Mumbai: वरळी पोलीस वसाहत हादरली; दोन संभाव्य कोरोनाबाधित सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:33 PM2020-04-02T16:33:29+5:302020-04-02T16:35:29+5:30
CoronaVirus In Mumbai : दोन संभाव्य कोरोनाबाधितांपैकी एक व्यक्ती व्हीव्हीआयपी व्यक्तींकडे सुरक्षेसाठी तैनात असायची.
मुंबई : वरळी पोलीस वसाहतीतही संभाव्य कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. संशयित रुग्णाना रुग्णालयात नेण्यात आले आहे. वरळी कोळीवाडा, आदर्शनगर नंतर आता कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही विळखा घातला आहे.
पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील दोघांना कोरोनाची काही लक्षण दिसून आली आहेत. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून त्यांनी इमारत सील केली आहे. दोन संभाव्य कोरोनाबाधितांपैकी एक व्यक्ती व्हीव्हीआयपी व्यक्तींकडे सुरक्षेसाठी तैनात असायची.
या व्यक्तीला २० मार्चपासून ताप येत होता. तर त्यांच्या पत्नीला काल रात्रीपासून ताप येत असल्याने पत्नीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या दाम्पत्याने दोन मुले आहेत. या मुलाला सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. वरळी कोळीवाडा, आदर्श नगर परिसरात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत कोळीवाडा भागात नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. येथील १०८ रहिवाशांपैकी ८६ रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे.