Coronavirus: दिलासादायक! मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका नाही? ८० टक्के लोकांना आधीच कोरोनाचा संसर्ग, अँटीबॉडीही विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:52 PM2021-07-01T17:52:29+5:302021-07-01T17:59:28+5:30
Coronavirus in Mumbai: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तिसऱ्या लाटेची फार चिंता करण्याची गरज नसल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे.
मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तिसऱ्या लाटेची फार चिंता करण्याची गरज नसल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. (Coronavirus in Mumbai) यावर्षी मुंबई शहरामध्ये १ जूनपर्यंत ८० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन ते बरे झाले आहेत. (CoronaVirus Positive News ) त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता कमी आहे. मुलभूत रिसर्च करणारी देशातील प्रसिद्ध संशोधन संस्था असलेल्या टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात याबाबतची शक्यता वर्तवली आहे.
संसर्गाचे आकडे आणि आतापर्यंत झालेल्या सीरो सर्व्हेच्या रिपोर्टच्या आधारावर TIFR च्या या अॅनॅलिसिस रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, यावर्षी १ जूनपर्यंत मुंबईमध्ये आतापर्यंत ८० टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊन बरे झाले आहेत. यामधील ९० टक्के लोक हे झोपडपट्ट्यांमध्ये आणि ७० टक्के लोक हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. (Mumbaikars are not in danger of the Covid-19 third wave? 80% of Mumbaikars already have corona infection and have developed antibodies)
TIFR च्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालेली आहे. जर तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल. रिपोर्टनुसार जे लोक पहिल्या लाटेमध्ये बाधित झाले होते. ते कमी झालेल्या अँटीबॉडीमुळे पुन्हा बाधित होऊ शकतात. पण हे व्हेरिएंटची बदललेली चाल आणि लसीकरणाची गती यावर अवलंबून असेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईमध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्ण हे ४ एप्रिल रोजी सापडले होते. त्या दिवशी मुंबईत कोरोनाचे ११ हजार १६३ रुग्ण सापडले होते. तर दुसऱ्या लाटेमध्ये दिल्लीत २८ हजार तर बंगळुरूमध्ये २५ हजार रुग्णांची नोंद एका दिवसात झाली होती. दिल्ली आणि बंगळुरूच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मुंबईमध्ये कमी दिसून आला होता.
१ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये १ फेब्रुवारीपर्यंत ६५ टक्के लोक कोरोना विषाणूमुळे बाधित झाले होते. मात्र मुंबईएवढीच लोकसंख्या असलेल्या बंगळुरूमध्ये सुमारे ४५ टक्के तर दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीमध्ये ५५ टक्के लोक १ फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे बाधित झाले होते.
मात्र महाराष्ट्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने या विश्लेषणाशी फारशी सहमती व्यक्त केलेली नाही. सरकारी कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, आजही मुंबईमध्ये ६०० ते ७०० रुग्ण सापडत आहेत. जर आमच्या ८० टक्के लोकसंख्येमध्ये खरोखरच अँटीबॉडी विकसित झालेल्या असतील तर एवढे रुग्ण दिसता कामा नये. .यामधून दोन निष्कर्ष निघू शकतात. जी अँटीबॉडी पाहिली गेली ती न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी होती की टोटल अँटीबॉडी होती हे पाहावे लागेल. कारण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ही अधिक महत्त्वाची असते.
दुसरा निष्कर्ष म्हणजे कदाचित ज्या लोकसंख्येचे अध्ययन करण्यात आले. त्यामध्ये अँटीबॉडी दिसून आली असावी. मात्र सर्वसामान्यपणे कदाचित एवढी अँटीबॉडी विकसित झालेली नसेल, असे त्यांनी सांगितले.