Coronavirus : मुंबईकरांनो, काळजी करण्याचे कारण नाही, पुरेशी खबरदारी, सुरक्षा बाळगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:14 AM2020-03-16T03:14:18+5:302020-03-16T03:14:54+5:30
मुंबईकरांनो, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. काळजी करण्याचेही कारण नाही. कारण पुरेशी सुरक्षा, खबरदारी बाळगली, तर आपण सहजच कोरोनाला थोपवू शकतो, असे संदेश देत, महापालिकेकडून मुंबईकरांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि आता शहर असे करत-करत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबईसह मुंबईतदेखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, असे असतानाही यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेसह मुंबईतील इतर प्राधिकरणेही सज्ज असून, मुंबईत सर्वत्र याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू झाली आहे. याहूनही सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांनो, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. काळजी करण्याचेही कारण नाही. कारण पुरेशी सुरक्षा, खबरदारी बाळगली, तर आपण सहजच कोरोनाला थोपवू शकतो, असे संदेश देत, महापालिकेकडून मुंबईकरांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई महापालिका, रेल्वे प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोलीस अशी सर्वच प्राधिकरणे कोरोनाला थोपविण्यासाठी सज्ज आहेत. आरोग्य विभागाने तर आवश्यक ठिकाणी सर्व सेवा-सुविधा पुरविल्या आहेत. कुठेही कसलीही कसर राहणार नाही, याची काळजी प्रत्येक प्रशासन आपल्या स्तरावर घेतली जात आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यापासून सर्वत्र याबाबत घेण्यात येत असलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत आणखी जनजागृती केली जात आहे. विशेषत: मुंबईची लोकल भरून वाहत असते. त्यामुळे धावत्या लोकलमध्येही मोठ्या प्रमाणावर जागृती सुरू झाली आहे. कोरोनाबाबत कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये, अशी प्रत्येक गोष्ट धावत्या लोकलमध्ये संदेशाद्वारे रेल्वेच्या माध्यमातून दिली जात आहे.
३१ मार्चपर्यंत शाळाही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याने लहान मुलांबाबत, ज्येष्ठ नागरिकांबाबत काय खबरदारी घ्यावी, याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. पाणी शुद्ध करण्यासाठीची औषधे खरेदी करण्यासाठी मुंबईकर मेडिकलमध्ये धाव घेत आहेत.
बेस्ट बसचे वाहक आणि चालक मास्क लावून कार्यरत आहेत. दुकानदारही मास्क लावून कार्यरत आहेत. रेल्वे, बससह मुंबईत ठिकठिकाणी मुंबईकर मास्क लावून खबरदारी घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. खबरदारी घेण्यासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर केला जात आहे.
गिरगावची गुढीपाडवा स्वागतयात्रा रद्द
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहर उपनगरात जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सणवारांवरही या आजाराचे सावट आहे. गिरगाव येथील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित होणारी भव्य स्वागतयात्रा रद्द करण्याचा निर्णय स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने घेतला आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेले दोन महिने या यात्रेची तयारी जोमाने करत आहेत. जागतिक स्तरावर कोरोना विषाणूचे थैमान पाहता, समाजामधील द्विधा मन:स्थिती व भीती या सर्वांचा विचार करता, तसेच प्रशासनालाही सहकार्य करण्याच्या भूमिकेतून गुढीपाडवा साजरा करतानाच कोरोनाविषयीची जनजागृती करण्याचे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. कार्यकर्ते पाडव्याच्या दिवशी घरोघरी जाऊन कोरोना विषाणूसंदर्भात ‘न घाबरता करू जागरूकता’ या अंतर्गत प्रबोधन करणार आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता फडके श्रीगणेश मंदिर येथे गणेश पूजन करून २२ फूट उंच कागदी लगद्यापासून महारुद्र हनुमानाच्या हातातील गुढीचे पूजन करून ठाकूरद्वार चौक गुढ्यांनी सजवून गुढीपाडवा साजरा करणार आहोत. मात्र, एक महिन्यानंतर अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी रविवार, २६ एप्रिल, २०२० रोजी नववर्षाच्या स्वागताचा उत्सव मिरवणुकीद्वारे केला जाईल़
कुर्ल्यातील नववर्ष यात्रा रद्द
कोरोनापासून सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार जमावबंदी टाळावी, म्हणून सामाजिक भान आणि सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, यंदाची नववर्ष स्वागत यात्रा २०२० ही सर्वानुमते रद्द करण्यात आली आहे. मात्र, आपापल्या परिसराची स्वच्छता, रांगोळ्या, सुशोभीकरण करावे, तसेच परंपरेनुसार २५ मार्च रोजी वाडिया इस्टेटमधील इमारत क्रमांक १० येथे सार्वजनिक गुढी सकाळी ९ वाजता उभारण्यात येईल, अशी माहिती कुर्ला पश्चिम येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीकडून देण्यात आली.
प्राणिसंग्रहालय बंद
कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भायखळा (पश्चिम) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय १५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहील. नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, प्रशासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येऊ नये व सहकार्य करावे.
केंद्राचे कार्यक्रमही पुढे ढकलले
वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रानेही जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि चित्रस्पर्धा पुढे ढकलली आहे. पुढील सूचना मिळाल्यानंतर, याची अधिक माहिती दिली जाईल, असे केंद्राकडून सांगण्यात आले.
बायोमेट्रिक बंद : कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीच्या वापरास ३१ मार्चपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीमध्ये हजेरी नोंदवहीत करण्यात येईल. वहीतील नोंद मानव संसाधन कार्यप्रणालीत नोंदविण्यात येणार आहे. मानव संसाधन कार्यप्रणालीत नोंदविलेली हजेरी आस्थापना प्रमुखांनी पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत प्रणालीत मंजूर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. मंजुरी नसलेल्यांच्या हजेरीच्या नोंदी, अनुपस्थिती समजण्यात येऊन वेतन रोखण्याची कारवाई करण्यात येईल.
मोनोमध्येही साफसफाई
देशामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एमएमआरडीए सतर्क झाली आहे. मोनोच्या डब्यांमध्ये, मोनो स्थानकांवर, रेलिंग, जिने आणि तिकीट खिडक्या अशा प्रवाशांच्या संपर्कात येणाºया जागा निर्जंतुकीकरणांनी स्वच्छ करण्यात येत आहेत.
ही साफसफाई करणाºया कामगारांनाही हातमोजे, मास्क आणि इतर उपकरणे वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ही साफसफाई करण्यात येत आहे. मोनो स्थानकांवर शौचालयांचीही वेळोवेळी साफसफाई केली जाते.
वर्सोव्यातील शाळेत जनजागृती
मुंबई : सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, शनिवारी सकाळी ८ ते १० या वेळेत वर्सोव्याच्या चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत येथील प्राचार्य अजय कौल यांनी कोरोनाबाबत विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी खास नानावटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सत्यजित चौधरी यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या शाळेच्या प्रत्येक वर्गात जाऊन डॉ. सत्यजित चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी आवश्यक माहिती दिली़
हॉटेल उद्योगाला बसला फटका
मुंबई : कोरोनामुळे हॉटेल उद्योगाला मोठे नुकसान होत असून, हॉटेल उद्योगाला सवलत देण्यात यावी, अशी मागणी आहारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आहाराचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या संकटामुळे; सरकारकडून काही सवलती देण्यात याव्यात. यामध्ये परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत उत्पादन शुल्क एफएल, परवान्यांच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात यावी. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एलपीजीवरील राज्य करात घट करावी. आगामी तिमाहीसाठी मालमत्ता करात माफी द्यावी़
तपासनिसांकडून मास्कचा वापर
मुंबई : कोरोना विषाणूचा धसका सर्वांनी घेतला आहे. यामध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. मोटरमन, गार्ड, तिकीट तपासनीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर केला जात आहे, तर मध्य रेल्वेच्या कार्यालयात सॅनिटायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे मंडळाकडून कोरोना विषाणूपासून खबरदारी म्हणून लोकल, रेल्वे स्थानकात दक्षता आणि काळजीचे फलक लावले आहेत. यासह प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या सतत संपर्कात असलेल्या रेल्वे कर्मचारीही मास्कचा वापर करत आहेत. दररोज लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसमधील तिकीट तपासनीस आणि लोकलचे मोटरमन, गार्ड मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.